‘नासाका’चा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:03+5:302021-07-10T04:12:03+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सकाळी ऑनलाइन सभा घेण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला नाशिक साखर कारखाना पूर्ववत ...
कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सकाळी ऑनलाइन सभा घेण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला नाशिक साखर कारखाना पूर्ववत सुरू होण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक सक्षम आहे का, असा सवाल काही सभासदांनी उपस्थित केला असता, त्यावर सभापती पिंगळे यांनी आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत कारखाना सुरू झाल्यास बेरोजगार झालेल्यांचा प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे कारखाना सुरू करणे महत्त्वाचे असून, आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहून कारखाना सुरू करावा, असे स्पष्ट केले.
यावेळी उपस्थितांनी कारखाना सुरू करावा मात्र यात कुठलेही राजकारण आणू नये व शेतकरी हिताचा विचार करावा, असे मत मांडले. बाजार समिती व नासाका सभासद यांच्यासोबत चर्चा करून संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेत नाशिक साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य शासनाला प्रस्ताव सादर करून निविदाप्रक्रियेत भाग घेण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करणार असल्याचे पिंगळे यांनी शेवटी सांगितले. ऑनलाइन सभेला उपसभापती प्रभाकर मुळाणे, संपतराव सकाळे, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, भाऊसाहेब खांडबहाले, रवि भोये, श्याम गावीत, संजय तुंगार, चंद्रकांत निकम, प्रवीण नागरे, विमल जुंद्रे, सचिव अरुण काळे, निवृत्ती बागुल, घोलप, अभियंता रामदास रहाडे, नासाका संचालक नामदेव गायधनी, लीला गायधनी, बाबूराव दलवाडे, बापू थेटे, भाऊसाहेब ढिकले, किरण गायधनी, विलास गायधनी, पी. जी. गुळवे, अनिल मोराडे उपस्थित होते.