मालेगाव महापालिका ठेकेदारांचा काम बंद आंदोलनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 04:35 PM2019-01-28T16:35:31+5:302019-01-28T16:39:50+5:30
मालेगाव महापालिकेकडे गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेले कामांचे बिल तातडीने अदा करावे या मागणीसाठी महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत बिले अदा होत नाहीत तोपर्यंत महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेणार नसल्याचे महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम पाटील, उपाध्यक्ष संजय घोडके व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२०१६-१७ मध्ये महापालिकेचे परवानाधारक ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले रोखण्यात आली आहे. १५६६ कामांची थर्डपार्टी आॅडीट झाल्यानंतरच बिल अदा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून महापालिका परवानाधारक ठेकेदारांनी पूर्ण झालेल्या कामांची बिले जमा केल्यानंतर प्रशासकीय तपासणी झाली आहे. त्रयस्थ पार्टी तपासणी देखील झाली आहे. कामांचा दर्जाही चांगला असल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे असे असताना महापालिका प्रशासन बिले अदा करण्यास टाळाटाळ करीत आहे. ठेकेदारांचे भांडवल कामांमध्ये अडकले आहे. मजुरांना रोजगार देण्यास अडचण निर्माण झाली आहे. महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून सुमारे साडेचार हजार रखडलेली बिले अदा करावीत या मागणीसाठी सोमवार पासून सद्यस्थितीत सुरु असलेली कामे बंद करण्यात येणार आहेत. तसेच निविदा प्रक्रियेतही सहभाग घेणार नसल्याचे पाटील, घोडके यांनी सांगितले.