भगवानगडावरच मेळावा घेण्याचा समर्थकांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:52 PM2017-09-28T23:52:34+5:302017-09-29T00:08:29+5:30
भगवानगडावरील दसरा मेळावा हा वंजारी समाजाला विचार व दिशा देणार असतो. समाज विकासाचे व्यासपीठ असलेल्या या मेळाव्याकडे कुणीही राजकीय दृष्टीने पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला पक्षीय बिरुद लावू नये. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा भगवानगडावरच घेण्यात येईल, अशी माहिती अखिल वंजारी विकास परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
नाशिक : भगवानगडावरील दसरा मेळावा हा वंजारी समाजाला विचार व दिशा देणार असतो. समाज विकासाचे व्यासपीठ असलेल्या या मेळाव्याकडे कुणीही राजकीय दृष्टीने पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला पक्षीय बिरुद लावू नये. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा भगवानगडावरच घेण्यात येईल, अशी माहिती अखिल वंजारी विकास परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या आवारात अखिल वंजारी विकास परिषदेच्या पदाधिकाºयांची तातडीची बैठक झाली. माजी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर विचारांचे देवाण-घेवाण सुरू करण्यासाठी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याच्या आयोजनास गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी विरोध केला आहे. त्यामुळे वंजारी समाजात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे बैठकीत मान्यवरांनी सांगितले. पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याच्या भूमिकेला अखिल वंजारी विकास परिषदेने पाठिंबा दिला असून, पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. भगवानगड हा सर्व समाजाचा असून, तेथे आलेले सर्वजण राजकीय जोडे बाजूला ठेवूनच येत असतात. गडावरील महंतांनी त्यांना परवानगी नाकारल्याने खरे राजकारणी कोण? असा प्रश्न उपस्थितांनी व्यक्त केला. पंकजा मुंडे यांना परवानगी नाकारण्याच्या निर्णयाचा महंत नामदेवशास्त्री सानप यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. बैठकीस संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक, एन. एम. आव्हाड, माजीमंत्री तुकाराम दिघोळे, नरेंद्र दराडे, पंढरीनाथ थोरे, उदय सांगळे, प्रभाकर धात्रक, महेश आव्हाड, माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रकाश घुगे, बाळासाहेब गामणे, संपत वाघ, सुनील केदार, साहेबराव आव्हाड उपस्थित होते.