महापालिकेच्या स्थायी सदस्यांचा उद्या फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:45 AM2019-02-24T00:45:47+5:302019-02-24T00:46:19+5:30
महापालिकेच्या लाख मोलाच्या स्थायी समितीचे सभापती सोडण्यास चार सदस्य तयार नाहीत. त्यामुळे आता मुंबईत सोमवारी (दि.२३) या सर्वांना बोलावून निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे.
नाशिक : महापालिकेच्या लाख मोलाच्या स्थायी समितीचे सभापती सोडण्यास चार सदस्य तयार नाहीत. त्यामुळे आता मुंबईत सोमवारी (दि.२३) या सर्वांना बोलावून निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे. गेल्यावेळी आमदारांना कोटा वाटून देण्यात आला होता आणि त्यानुसार त्यांनी सदस्य दिले होते. आता मात्र अगोदरचे चार सदस्य राजीनामा देत नसल्याने आता त्यांच्यावर अन्य इच्छुकांचा दबाव वाढला आहे. भाजपाचा सदस्य नियुक्तीचा हा घोळ दि. २८ फेब्रुवारीपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य फेबु्रवारीअखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नूतन सदस्य नियुक्तीसाठी येत्या गुरुवारी (दि. २८) विशेष महासभा महापौर रंजना भानसी यांनी बोलावली आहे. परंतु भाजपातच या विषयावरून रणकंदन सुरू झाले आहे. भाजपाचे दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड या सदस्यांना एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची तयारी सुरू आहे, परंतु महापौर आणि उपमहापौरपदाच्या अडीच वर्षांपूर्वीच म्हणजे सव्वा सव्वा वर्षे कालावधीसाठीच मुदत देऊन त्यांचे राजीनामे घेण्याचे ठरविण्यात आले होते. भाजपाचे महापालिकेत बहुमत असल्याने त्यांचा राजीनामा घेऊन त्या जागी अन्य नगरसेवकांना संधी देणे शक्य होते. परंतु त्यांचे राजीनामे घेतले नाहीत, मग स्थायी समितीच्या बाबतीच वर्षभरात निवृत्त करण्याचा प्रकार कशासाठी? असा प्रश्न स्थायी समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हा विषय प्रलंबित आहे. मध्यंतरी पालकमंत्री गिरीश महाजन हे या विषयावर तोडगा काढण्यासाठी दाखल झाले होते, परंतु त्यांना वेळ न मिळाल्याने शनिवारी (दि. २३) ते नाशिकमध्ये येऊन चर्चा करणार होते, परंतु तेही शक्य न झाल्याने आता सोमवारी (दि. २५) सर्व इच्छुकांना आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. त्यात निर्णय होणार आहे.
दरम्यान, सदस्य नियुक्तीसाठी अगोदरचे सदस्य राजीनामे देत नसल्याने अन्य इच्छुकांची मात्र अडचण झाली आहे. अन्य इच्छुकांचा दबाव वाढला आहे. गेल्यावेळी पद नियुक्तीच्या वेळी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांना चार, सीमा हिरे यांना तीन, तर फरांदे यांंना दोन जागांचा कोटा दिला होता आताही तो तसाच ठेवला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे इच्छुकांच्या आमदारांकडे चकरा सुरू झाल्या आहेत.
भाजपा निरंकुश
भाजपामध्ये यापूर्वी पक्षाने एखादा निर्णय घेतला तर त्याला आव्हान देण्याची पद्धत नव्हती. मात्र आता भाजपात ज्यांचा शब्द प्रमाण मानला जाईल असा मोठा नेता नाही. त्याच प्रमाणे अन्य नेतेदेखील वाढल्याने आता निर्णयाला विरोध करण्याचे प्रकार सुरू झाले आहे.