पाणीपट्टी दरवाढीचा आज फैसला
By admin | Published: April 20, 2017 01:11 AM2017-04-20T01:11:21+5:302017-04-20T01:11:40+5:30
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा गुरुवारी (दि.२०) सकाळी ११.३० वाजता होणार आहे.
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा गुरुवारी (दि.२०) सकाळी ११.३० वाजता होणार असून, स्थायीकडून घरपट्टी व पाणीपट्टीतील दरवाढीबाबत निर्णय होणार आहे. स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पाणीपट्टी दरात वाढ करण्याचे यापूर्वीच संकेत दिले आहेत, तर शिवसेनेने दरवाढीस तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे स्थायीच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.
महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी स्थायी समितीला सादर केले आहे. आयुक्तांनी अंदाजपत्रकात घरपट्टीमध्ये १४ टक्के तर पाणीपट्टीत प्रतीवर्षी १ टक्का दरवाढीची शिफारस केलेली आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची विशेष सभा गुरुवारी (दि.२०) होणार आहे.
सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पाणीपट्टीत कोणत्याही परिस्थितीत दरवाढ करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेने दरवाढ करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
खुद्द भाजपामध्येच काही सदस्यांकडून खासगीत पाणीपट्टीत वाढ करण्यास विरोध दर्शविला जात आहे. महापालिकेने अगोदर वॉटर आॅडिट पूर्ण करावे, पाण्याची गळती थांबवावी तसेच मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणीचोरीलाही आळा घालावा, मगच पाणीपट्टीत वाढ करावी, असा मतप्रवाह नगरसेवकांमध्ये आहे. सध्या महापालिकेकडून मिळकत सर्वेक्षण सुरू असल्याने घरपट्टीबाबतही दरवाढीचा विचार करू नये, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. विरोध असतानाही सत्ताधारी भाजपा काय निर्णय घेते याकडे आता लोकप्रतिनिधींसह नागरिकांचे लक्ष लागून आहे.