शिवसेनेचे विधानपरिषदेचे उमेदवार दराडे यांच्या अर्जावर थोड्याच वेळात निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 10:13 PM2018-05-04T22:13:37+5:302018-05-04T22:14:08+5:30
दराडेंच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप
नाशिक: नाशिक विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. शिवाजी सहाणे यांनी आक्षेप घेतला आहे. दराडे यांच्याकडे येवला नगरपरिषदेची थकबाकी असल्यानं तसंच त्यांनी नामनिर्देशन पत्र अपूर्ण भरल्यानं सहाणे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आलाय.
नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा, यासाठी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, माजी मंत्री बबन घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार अनिल कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून आहेत. शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार यांच्या दबावास बळी न पडता जिल्हा प्रशासनातर्फे थोड्याच वेळात दराडे यांच्या अर्जाविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. सकाळी छाननी सुरू झाल्यापासून आक्षेपावर वाद प्रतिवाद केला जात आहे. दरम्यान संध्याकाळनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.