देवळा नगरपंचायतीसाठी प्रभागरचना जाहीर
By admin | Published: September 26, 2015 09:50 PM2015-09-26T21:50:55+5:302015-09-26T21:51:33+5:30
हिरमोड : प्रारूप याद्या तयार झाल्यानंतर ३०१ तक्रारी
देवळा : नूतन देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७ प्रभागांची रचना करण्यात आली असून, प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला आहे. मतदार याद्यांवर ३०१ हरकती आल्या असल्याचे समजते.
सहा महिन्यांपूर्वी देवळा ग्रामपालिका विसर्जित करण्यात येऊन देवळा नगरपंचायतीची निर्मिती करण्यात आली होती. देवळ्याच्या तहसीलदार श्रीमती शर्मिला भोसले यांची नगरपंचायतीच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. नगरपंचायत निर्मितीनंतर सर्वांनाच निवडणुकीचे वेध लागले होते. यापूर्वी देवळा ग्रामपालिकेत सहा वॉर्ड होते. यापैकी पाच वॉर्डात प्रत्येकी तीन व एका वॉर्डात दोन असे एकूण १७ ग्रामपालिका सदस्यसंख्या होती. नगरपंचायत निर्मितीनंतर वॉर्डरचना बदलण्यात येऊन १७ प्रभागांची स्वतंत्र रचना करण्यात आली. १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. १७ जागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे - इतर मागासवर्गीय महिला राखीव-३, इतर मागावर्ग पुरुष-२, सर्वसाधारण महिला राखीव-४, सर्वसाधारण पुरुष-४, अनु.जाती पुरुष-१, अनु.जाती स्त्री राखीव-१, अनु. जमाती पुरुष-१, अनु.जमाती स्त्री राखीव-१.
आपापल्या पक्षाचे चिन्ह घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका उमेदवार लढतात. त्याठिकाणी नेहमी युत्या असतानाही स्वतंत्र निवडणुका लढविल्या जातात. त्यामागचे पक्षाचे धोरण असे असते की, पक्षाची निशाणी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी या हेतूनेच स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका स्वबळावर लढविल्या जातात. तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून आघाडी शासनाने तालुकास्तरावर असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला.
देवळा ग्रामपालिकेत स्थानिक पातळीवर नेत्यांची युती सर्वश्रुत होती. ग्रामपालिका असल्याने ही युती होत होती. परंतु आता देवळा ग्रामपालिकेला नगरपंचायतीचा दर्जा दिल्याने होऊ घातलेल्या निवडणुकीत सर्वच पक्ष उडी मारणार असून, चौरंगी लढत होऊ शकते. (वार्ताहर)