उतरती कळा तरीही पक्षाशी लळा!
By admin | Published: January 22, 2017 12:48 AM2017-01-22T00:48:54+5:302017-01-22T00:49:12+5:30
राष्ट्रवादी भवन गजबजले : इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ
नाशिक : जिल्ह्यातील पक्षाचे शक्तिशाली नेते छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ तुरुंगात, पिंगळे-नागरे प्रकरणांमुळे पक्षाची मलिन झालेली प्रतिमा यामुळे उतरती कळा लागलेली असतानाही राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी शनिवारी (दि.२१) पक्ष कार्यालयात गर्दी केली आणि मरगळलेल्या पदाधिकाऱ्यांच्या
जिवात जीव आला. यावेळी १६ प्रभागांसाठी १३० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. रविवारी (दि.२२) उर्वरित प्रभागांकरिता इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. भुजबळांच्या अनुपस्थितीत केविलवाणी स्थिती बनलेल्या राष्ट्रवादीकडूनही महापालिका निवडणूक लढविली जाणार आहे. कॉँग्रेसबरोबर अद्याप आघाडीचा निर्णय झाला नसला तरी पक्षाने निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी भवन येथे शनिवारी प्रभाग क्रमांक १ ते ११ आणि प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७ आणि २८ या करिता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाने स्थानिक पातळीवरच इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना बहाल केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश चिटणीस नाना महाले, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, अंबादास खैरे, सुनीता निमसे, संजय खैरनार, भारत जाधव, बालम पटेल व मुक्तार शेख या पॅनलने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी १३० उमेदवारांनी हजेरी लावली. उमेदवारांकडून प्रभागाची स्थिती, निवडून येण्याची क्षमता याविषयी प्रश्न विचारण्यात आले. राष्ट्रवादीकडे १२२ जागांकरिता २५९ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती रविवारी (दि.२२) घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर सविस्तर अहवाल येत्या २५ जानेवारीला पक्षश्रेष्ठींना सादर केला जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.