मालेगावी रुग्णसंख्येत घट; वाढत्या मृत्युदराने भय कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:16+5:302021-05-17T04:12:16+5:30
मालेगाव: शहरात गेल्या महिन्यात दररोज दीडशे ते दोनशे कोरोना बाधित मिळून येत. त्यामुळे शहरात ८३ असणारी बाधितांची संख्या वाढत ...
मालेगाव: शहरात गेल्या महिन्यात दररोज दीडशे ते दोनशे कोरोना बाधित मिळून येत. त्यामुळे शहरात ८३ असणारी बाधितांची संख्या वाढत पावणे दोन हजारांवर जाऊन पोहोचली. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट होऊ लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असतानाच कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे, गेल्या पंधरा दिवसात कोरोना बाधित रुग्ण मिळून येण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. काही दिवसांपूर्वी शहरातील बाधितांची संख्या दोन हजारांपर्यंत पोहोचलेली होती, आता मात्र रुग्ण संख्या घटल्याने ती १ हजार ३६० पर्यंत येऊन पोहोचली आहे.
मे महिन्यात गेल्या पंधरा दिवसात शहर तालुक्यातील ३७ बाधितांचा मृत्यू झाला आहे तर ६५७ बाधित मिळून आले आहेत. मे तालुक्यात देखील एक हजाराकडे वाढणाऱ्या बाधितांची संख्या घटत असून ती २९१ वर आली आहे. वाढत गेल्या महिन्यात २५ एप्रिल रोजी तब्बल १२१ बाधित रुग्ण मिळून आले होते, तर एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी ५० बाधित मिळाले आणि एक जण कोरोनाने दगावला होता, २७ एप्रिल रोजी केवळ १६ बाधित मिळून आले होते आणि एकही जण दगावलेला नव्हता. यामुळे शहरातील नागरिक सुखावत असताना २८ एप्रिल रोजी मात्र तब्बल ११६ बाधित मिळून आले आणि तिघांचा मृत्यू झाल्याने पुन्हा नागरिकांच्या मनात धडकी भरली. २९ रोजी बाधितांची संख्या कमी होऊन ३७ वर आली असली तरी मृतांची संख्या आणखी वाढली. त्या दिवशी चौघांना कोरोनाशी लढा देण्यात अपयश आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ३० एप्रिल रोजी पुन्हा अडीच पट बाधित वाढून त्यांची संख्या ८४ वर पोहोचली.आणि एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र मे महिन्याच्या गेल्या पाचच दिवसात आता पर्यंत २८२ बाधित मिळून आले असून त्यात सर्वाधिक म्हणजे एकूण १७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
इन्फो...
गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये एकही कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला नव्हता. मात्र यंदा मार्च २०२१ मध्ये मार्चमध्ये २२ मृत्यू झाले आहेत. याशिवाय गेल्या वर्षी २०२० मध्ये एप्रिल महिन्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र २०२१ मध्ये गेल्या महिन्यात एप्रिल २०२१ मध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक १६ जणांना बळी पडावे लागले, सध्या मे २०२१ महिन्यात ३७ बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे हॉट स्पॉट ठरलेले मालेगाव कोरोनामुक्त होत असताना यंदा २०२१ मध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. संपूर्ण तालुक्यातील बाधितांची संख्या तीन हजारांकडे वाटचाल करीत असताना आता पुन्हा लागलेल्या लॉकडाऊनमुळे घसरणारी बाधितांची संख्या तालुक्याला सुखावणारी असली तरी वाढते मृत्युदर ही मात्र निश्चितच चिंता वाढवणारी आहे.
नागरिकांनी आजही तितकीच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे मात्र नागरिक यावर्षी काही से गाफील राहिल्याने आणि विवाह सोहळे आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घर बाहेर पडल्याने बाधितांची संख्या वाढत गेली.