नाशिकमध्ये तलावात विसर्जनाला नकार
By श्याम बागुल | Published: September 13, 2018 05:51 PM2018-09-13T17:51:48+5:302018-09-13T17:55:57+5:30
गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे
नाशिक : गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावातील पाणी दूषित होण्याबरोबरच गत काही अनुचित घटनांचा विचार करता यंदाही विल्होळीच्या तलावात गणेश विसर्जन न करण्याचा व करू देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.
येथील हनुमान मंदिर येथे विल्होळी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामसभा घेण्यात आली. गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे मागे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दोन ते तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सदर तलावातील गाळ, मुरूम काढण्यात आलेल्या असून, तलावामध्ये ओबडधोबड स्वरूपाचे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तलावातील पाण्यामुळे या खड्ड्यांचा व खोलीचा अंदाज येत नाही. तसेच विसर्जन काळात मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने विल्होळी तलावात विसर्जन बंदी कायम ठेवण्यावर ग्रामस्थांचे एकमत झाले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत मोहिते यांनी गावकºयांना मार्गदर्शन केले. महामार्गावर असलेले विल्होळी गाव संवेदनशील असल्याचे समजले होते. परंतु गावातील एकोपा पाहिल्यावर कायदा व सुव्यवस्था राखणारे गाव असल्याचे जाणवले. गावात एकोपा नांदून गुन्हे कमी कसे होतील यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. तालुका पोलीस ठाण्यापासून विल्होळी गाव दूर असले तरी, ग्रामस्थांनी अडचणीच्या काळात भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा त्यांना प्रतिसाद दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी विल्होळी सरपंच बाजीराव गायकवाड, उपसरपंच श्री कृष्ण मते, सदस्य सोमनाथ भावनाथ, माजी पंचायत समिती उपसभापती सुजाता रूपवते, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष देवरे, पोलीसपाटील संजय चव्हाण, मनोहर भावनाथ, मोतीराम भावनाथ उपस्थित होते.