नवीन रुग्णसंख्येत घट, मात्र बळी ४३ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:17 AM2021-05-25T04:17:13+5:302021-05-25T04:17:13+5:30
नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २४) नवीन ६७७ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत ...
नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २४) नवीन ६७७ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असली तरी जिल्ह्यात ४३ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४४१४ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या सातत्याने बाधितांच्या तुलनेत अधिक राहात आहे. त्यामुळेच सोमवारी एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत अजून घट होऊन ही संख्या १५,२४४ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३१६, तर नाशिक ग्रामीणला ३५० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात २१, ग्रामीणला १७ आणि मालेगाव मनपात ५ असा एकूण ४३ जणांचा बळी गेला आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी प्रदीर्घ काळापासून उपचार घेऊनही बरे न झालेले रुग्ण दगावत असल्यानेच बळींच्या संख्येत वाढ दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९५ टक्क्यानजीक
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९४.८३ टक्क्यावर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९८.०५ टक्के, नाशिक शहर ९६.६३, नाशिक ग्रामीण ९२.४१, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८९.०३ टक्क्यांवर पाेहोचला आहे.
इन्फो
प्रलंबित अहवाल दोन हजारांवर
जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या घटून २३७५ वर आली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या घटू लागल्याने आता दोन दिवसांतच अहवाल मिळू लागले आहेत. त्यामुळेच सोमवारी नाशिक शहरातील ११८४, नाशिक ग्रामीणचे १०४९, तर मालेगाव मनपाचे १४२ असे एकूण २३७५ अहवाल प्रलंबित होते.