यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:39 AM2019-09-03T01:39:06+5:302019-09-03T01:39:24+5:30
दिवसेंदिवस विविध शासकीय नियम अधिकाधिक कठोर होत चालले असून, दुसरीकडे महागाईमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना परिसरातून मंडळांना मिळणाऱ्या देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी माघार घेतली आहे.
नाशिक : दिवसेंदिवस विविध शासकीय नियम अधिकाधिक कठोर होत चालले असून, दुसरीकडे महागाईमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना परिसरातून मंडळांना मिळणाऱ्या देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी माघार घेतली आहे. मागील वर्षी लहान-मोठ्या मंडळांची संख्या ८२९ होती. यंदा मात्र एकूण ६९५ मंडळांची पोलीस प्रशासनाच्या विशेष शाखेकडे नोंद झाली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह अन् आनंद तरुणाईचा गगणात मावेनासा असतो. तरुणाई मोठ्या आतुरतेने गणेशोत्सवाची वाट बघत असते. दरवर्षी तरुण मित्रमंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात भाग घेतला जातो. विविध सामाजिक, राजकीय विषयांवरील प्रबोधनपर देखावे असो किंवा आकर्षक आरासची सजावट करून आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना मंडळांकडून करण्यात येते. यावर्षीदेखील तरुणाईचा उत्साह तितकाच असला तरी महागाईचे सावट अन् बाजारपेठेत.
पोलिस ठाण्यांमध्ये शहरातील गणेशोत्सवाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक मोठी गणेश मंडळे भंद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी ४२ मोठे मंडळे आहेत. तर १० मौल्यवान मंडळाची नोंदणी झाली आहे. त्या खालोखाल पंचवटी आणि गंगापूर या भागात प्रत्येकी १८ मोठे गणेश मंडळे उत्सव साजरा करीत आहेत. इंदिरानगरमध्ये लहान मोठे मिळून जवळपास ५५ तर नाशिकरोड परिसरात ४८ सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सवाची तयारी केली आहेत.
अंबड येथे सर्वाधिक मंडळांची नोंदणी झाली. १०४ एकूण गणेश मंडळे असून ९९ लहान तर ३ मोठे मंडळे आहेत. सरकारवाडा हद्दीत ६, पंचवटीत ४ तर देवळाली कॅम्पला ७ मौल्यवान गणेश मंडळाची नोंदणी पोलिसांनी केली आहे.
आलेल्या आर्थिक मंदीचा फटका गणेशोत्सवाला बसत असल्याचे दिसून येत आहे. महागाई वाढत असून, शासकीय, प्रशासकीय नियमावली अधिकाधिक कडक होत चालल्यामुळे यावर्षी आतापर्यंत ६९५ मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला आहे. मागील वर्षी ही संख्या ८२९ इतकी होती. यंदा ३६ मुख्य मंडळे असून, गेल्या वर्षी ३९ मंडळे होती. तसेच १९२ मोठ्या मंडळांपैकी यंदा केवळ १५८ मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे लहान मंडळांची संख्यादेखील ९७ने घटली असून, यंदा ५०१ मंडळांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. शहरात एकूण ६९५ मंडळांचा सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग आहे. मागील वर्षी ८२९ मंडळे सहभागी होती.
पोलीस ठाणेनिहाय मंडळे अशी
पोलीस ठाणे मौल्यवान मोठे लहान एकूण
भद्रकाली - १० ४२ २८ ८०
मुंबई नाका - ०१ ०६ १९ २६
सरकारवाडा - ०६ ०४ ३८ ४८
पंचवटी - ०४ १८ ४१ ६३
आडगाव - — ०९ २५ ३४
म्हसरूळ - — ०४ ३२ ३६
गंगापूर - ०१ १८ ३४ ५३
सातपूर - ०३ ११ ४३ ५७
अंबड- ०२ ०३ ९९ १०४
इंदिरानगर - — ०५ ५० ५५
उपनगर - ०२ १२ ४५ ५९
ना.रोड- — ११ ३७ ४८
दे.कॅम्प - ०७ १५ १० ३२