मालेगावी कोरोनामुळे क्षयरुग्ण निदान संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:14 AM2021-04-08T04:14:48+5:302021-04-08T04:14:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने शिरकाव केल्याने बाधितांची संख्या वाढत आहे; मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे ...

Decrease in the number of TB patients due to Malegaon corona | मालेगावी कोरोनामुळे क्षयरुग्ण निदान संख्येत घट

मालेगावी कोरोनामुळे क्षयरुग्ण निदान संख्येत घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने शिरकाव केल्याने बाधितांची संख्या वाढत आहे; मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे शहरातील नोंदणीकृत क्षयरुग्ण निदानाची संख्या कमी झाल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाचे क्षयरोग विभागप्रमुख डॉ. अमोल दुसाने यांनी केला आहे. मालेगाव येथे जानेवारी ते डिसेंबर २०१९ या काळात १ हजार ४०४ क्षयरुग्ण सापडले होते, त्यात ६१६ जणांनी खासगी रुग्णालयात तर ७८८ जणांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले होते. गेल्यावर्षी २०२०मध्ये त्या तुलनेत ३५१ रुग्ण घटल्याचे समोर आले आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२०मध्ये नोंदणीकृत एकूण १,०५३ क्षयरुग्णांचे निदान झाले. त्यात सरकारी दवाखान्यात ६३० तर खासगी रुग्णालयातून आलेल्या ४२३ जणांवर मनपा क्षयरोग विभागाने उपचार केले. यावर्षी २०२१मध्ये मार्चपर्यंत २९१ क्षयरुग्ण सापडले आहेत. त्यातील सरकारी दवाखान्यात १५५ तर खासगी रुग्णालयातून आलेल्या १३६ जणांवर मनपा क्षयरोग विभागाने उपचार केले.

कोरोना परिस्थितीचा नोंदणीकृत क्षयरुग्णांच्या संख्येवर निश्चितच परिणाम झाल्याचे २०२०च्या रुग्णसंख्येवरून दिसून येते. हा परिणाम पूर्ण देशात व राज्यातही झालेला दिसून येतो. तरीही २०२०च्या कोविड-१९ तसेच लॉकडाऊनच्या परिस्थितीतही मालेगाव महानगरपालिका हद्दीतील निदानाच्या व उपचाराच्या सुविधा मिळण्यासाठी शक्य तेवढी पूर्ण काळजी घेण्यात आली होती.

इन्फो...

मृत्यूदरात वाढ, घट नाही

क्षयरुग्णांच्या मृत्यूदरात कुठल्याही प्रकारची वाढ अथवा घट कोरोना कारणांमुळे आढळून आली नाही. हे रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांच्या उपचाराची सोय डॉट्स प्लस साईट डॉ. वसंतराव पवार आडगाव मेडिकल कॉलेज, नाशिक येथे करण्यात आली होती. मागील वर्षी उपचार करण्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. कारण लॉकडाऊनमुळे रुग्ण दवाखान्यात येण्यास घाबरत होते. अशावेळी शहर क्षयरोग सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी बऱ्याच जणांना डॉट्स उपचार त्यांच्या घरी जाऊन दिला. काही रुग्णांचे थुंकी नमुने हे मुंबई अथवा पुणे येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात. परंतु, ट्रान्सपोर्ट सुविधा बंद असल्यामुळे यातही अडथळे निर्माण झाले होते, यातून मार्ग काढत हे नमुने वेगळ्या पॅकिंगमधून रोज कोविड टेस्टिंगसाठी नमुने घेऊन जाणाऱ्या व्हॅनमधूनही पाठविण्यात आले. मालेगाव शहर क्षयरोग दुरीकरण सोसायटीमध्ये आजघडीला १६ कर्मचारी कार्यरत आहेत. लवकरच आणखी दोन जागा भरल्या जाणार आहेत.

इन्फो...

रूग्णांसाठी आवाहन

दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा ताप, दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे इत्यादी लक्षणांपैकी एकही लक्षण असल्यास त्यांनी आपली तपासणी कुठलीही भीती न बाळगता वेळीच डॉक्टरांकडून करून घ्यावी. क्षयरोगाचे निदान झाल्यास घाबरू नये व त्याचा उपचार पूर्ण करावा. पूर्ण उपचार केल्यास खात्रीने रुग्ण पूर्णपणे बरा होतो. उपचार सुरु असताना काही त्रास झाल्यास त्याची माहिती डॉक्टरांना द्यावी व त्यावरील उपचार करून घ्यावे. परंतु, क्षयरोगाचे उपचार बंद करू नयेत. उपचार अर्धवट सोडल्यास गुंतागुंतीच्या प्रकाराचा क्षयरोग होऊ शकतो. मधुमेह व एचआयव्हीग्रस्त लोकांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण जास्त आढळते.

Web Title: Decrease in the number of TB patients due to Malegaon corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.