जिल्ह्यातील चाचण्यांतून बाधितांच्या प्रमाणात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:25 AM2020-05-17T00:25:31+5:302020-05-17T00:29:48+5:30
नाशिक : मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या चाचणीतून बाधित रुग्ण आढळण्याच्या सरासरी प्रमाणात घट येण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही आशादायक बाब असून, शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांमधून हे निदर्शनास आल्याने आपण या आपत्तीवर सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच मात करू, असा आशावाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक : मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या चाचणीतून बाधित रुग्ण आढळण्याच्या सरासरी प्रमाणात घट येण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही आशादायक बाब असून, शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांमधून हे निदर्शनास आल्याने आपण या आपत्तीवर सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच मात करू, असा आशावाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभरात झालेल्या चाचण्यांमधून तीन बाधित आले असले तरी पूर्वीच्या चाचणी आणि बाधितांच्या तुलनात्मक प्रमाणात घट येत असल्याचा दावादेखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
मालेगावमधील बाधित संख्येत शनिवारी दुपारी अजून तीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मालेगावच्या बाधितांचा आकडा ६०५ वर, तर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ७७८ वर पोहोचला आहे. शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या ९३ अहवालांमध्ये ९० अहवाल निगेटिव्ह, तर तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे तिन्ही बाधित अहवाल मालेगावच्या नागरिकांचे आहेत. त्यात एका युवकासह दोन मध्यमवयीन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आता नाशिक शहरातील
बाधितांची संख्या ४५, तर नाशिक ग्रामीणमध्ये ९८वर पोहोचली असून, ३० बाधित रुग्ण हे नाशिक जिल्ह्याबाहेरील आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांसह पोलीस, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनादेखील कोरोना विषाणूने आपल्या विळख्यात घेतल्याने सर्वांचीच चिंता महिनाभर खूपच वाढलेली होती. त्यातच मालेगाव शहराचा वाढता आकडा चिंताजनकरीत्या वाढत होता. गेल्या दीड महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७७८ वर पोहोचली होती.