ढगाळ वातावरणामुळे कांदा बियाणांच्या उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:17 PM2020-02-14T18:17:41+5:302020-02-14T18:17:47+5:30
खामखेडा : गेल्या काही दिवसापासून शिवारात प्रत्येक शेतकऱ्याच्या मळ्यात कांदा बियाणाचे पीक दिसून येत आहे, परंतु चालू वर्षी सतत बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या बियाणाच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतित आहे.
यामुळे कांद्याची गळती होत नाही आणि निघाला तर त्या कांद्याचा रंग भगवा किंवा निळा निघतो. या कांद्यांना दर मिळत नाही. यामुळे शेतकºयाची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होते. म्हणून प्रत्येक शेतकरी कांद्याच्या डोंगळ्यांची लागवड करतो.
शेतकरी कांद्याच्या या डोंगळ्याची लागवड दसरा झाल्यानंतर करतो. मार्च महिन्यात तो परिपूर्ण तयार होतो. यासाठी चांगला आणि दर्जेदार कांदा निघण्यासाठी शेतकरी स्वत: कांद्याचे बियाणे लागवड करतो. यासाठी तो चांगल्या प्रतीच्या कांद्याची निवड करून त्या कांद्याला मध्यभागी कापून मुळाकडचा भाग जमिनीत एक फूट अंतरावर लागवड करतो. कांद्याला चांगला कलर यावा म्हणून या डोंगळ्यामध्ये झेंडूची तुरळक झाडे लावली जातात. त्यामुळे या झेंडूचे परागकण या कांद्याच्या डोंगळ्यावर पडून चांगले दर्जेदार बियाणे तयार होऊन लाल कांदा तयार होतो. या स्वयंनिर्मित कांद्याच्या बियाणांमुळे चांगल्या प्रतीचा कांदा तयार होतो. यामुळे बाजारभावही चांगला मिळतो, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत नाही.
जी काही कांदा बियाणाची डोंगळे निघाली आहेत ती या वातावरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात फुललेली नाहीत, तर काही डोंगळे फुलणे बाकी आहेत. त्यावर या वातावरणाचा परिणाम होतो की काय याची भीती शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे. जर यापुढे असे वातावरण राहिले तर पुढे कांद्याचे बियाणे कमी प्रमाणात तयार होतील, त्यामुळे उन्हाळ कांद्याच्या बियाणांचा तुटवडा होणार आहे.