बोगस कांदा बियाण्यांमुळे उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 06:28 PM2021-04-05T18:28:48+5:302021-04-05T18:29:44+5:30
मानोरी : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांमध्ये फसगत झालेली असताना काही ठिकाणी कांदा जमिनीतच सडून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याने यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात घट होणार असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीचा देखील फटका बसणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.
मानोरी : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांमध्ये फसगत झालेली असताना काही ठिकाणी कांदा जमिनीतच सडून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याने यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात घट होणार असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीचा देखील फटका बसणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.
यंदा येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली असून, ऐन काढणीला आलेला कांद्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांदा उत्पादनात घट होणार आहे.
दरवर्षी मुबलक प्रमाणात पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे उत्पादन शेतकरी घेत होते. यंदा मात्र पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने उन्हाळ कांदा उत्पादनात देखील घट होणार असल्याने आर्थिक नियोजन कोलमडणार असल्याचे देखील शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. त्यात उन्हाळ कांद्याला दरही समाधानकारक मिळत नसल्याने उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली असल्याचे दिसून येत आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे रोपांसह बियाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अनेक ठिकाणी उन्हाळ कांद्याची उशिरा लागवड शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे. मात्र, उशिरा केलेल्या कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची बियाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फसगत झाल्याने कांदा लागवडीनंतर काही दिवसांतच कांद्यांना डोंगळे आल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असल्याचे दिसून येत आहे.
कांद्यांना डोंगळे आल्याने यंदा कांदा साठवावा की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. डोंगळे आलेले कांदे आधीच पाण्याविना करपून चालले असताना त्यात डोंगळ्यांचे प्रमाण अधिक असल्याने उन्हाळ कांदा साठवून ठेवल्यास कांदा लवकर खराब होण्याची धास्ती शेतकरी वर्गासमोर उभी राहिली आहे.
दरम्यान, कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, कांद्यांना केलेल्या मशागतीचा उत्पादन खर्च निघणेदेखील सध्या शेतकऱ्यांना दुरापास्त होत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर सर्वत्र सरासरीच्या तुलनेत एक हजार रुपयांच्या खाली असल्याने कांदा साठवून ठेवावा की अल्प दरात विकावा, अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची बियाण्यांमध्ये फसगत झाल्याने उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात कांद्यांना दरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवणे देखील अवघड होणार असून, त्यात लॉकडाऊन झाल्यास यंदा उन्हाळ कांद्याला हजारो रुपये खर्च करून पदरी निराशा पडल्याशिवाय राहणार नाही.
- सागर वाकचौरे, शेतकरी, शिरसगाव लौकी.