दररोज पाच वीज ग्राहकांच्या जोडण्या तोडण्याचे फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:53 AM2019-08-26T01:53:42+5:302019-08-26T01:54:08+5:30

थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने अधिक कठोर निर्णय घेत वीज ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले असून, तसे फर्मानच महावितरणने काढले आहे. दररोज किमान पाच थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची सक्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे,

 Decree to disconnect five electricity customers daily | दररोज पाच वीज ग्राहकांच्या जोडण्या तोडण्याचे फर्मान

दररोज पाच वीज ग्राहकांच्या जोडण्या तोडण्याचे फर्मान

Next

नाशिक : थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने अधिक कठोर निर्णय घेत वीज ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले असून, तसे फर्मानच महावितरणने काढले आहे. दररोज किमान पाच थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची सक्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे, तर वीजपुरवठा तोडण्याची कोणतीही लेखी नोटीस ग्राहकांना देण्यात येणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळेही महावितरणचा हा निर्णय सुलतानी फतवा असल्याची टीका होऊ लागली आहे.
सातत्याने विस्कळीत होणारा वीजपुरवठा आणि चुकीच्या वीज बिलांमुळे सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड यासारख्या प्राथमिक पातळीवरील अडचणींचे आजतागायत निवारण होऊ शकलेले नसताना थकीत वीज बिल वसुलीसाठी मात्र महावितरणकडून नेहमीच सक्तीची भूमिका घेतली जाते. यंदा तर महावितरणने कळसच गाठला आहे. ग्राहकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची कोणतीही संधी न देता थेट वीजजोडणी तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. थकबाकीदार असतानाही वेळेत वीज बिल भरले नसेल आणि वारंवार बिल भरण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असेल तर अशा ग्राहकांना पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे महावितरणे म्हटले आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित करताना वायरमनला दमदाटी, शिवीगाळ, हाणामारीचे प्रकार केले किंवा धमकी दिली तरी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
थकबाकीदार ग्राहकांपैकी किमान पाच ग्राहकांची वीजजोडणी दररोज तोडण्याची सक्ती महावितरणच्या कर्मचाºयांना करण्यात आली आहे. थकबाकीदार ग्राहकांची यादी हातात आल्यानंतर कर्मचाºयाने संबंधीतील यादीतील पाच ग्राहक निवडून त्यांची वीजजोडणी खंडित करणे बंधनकारक केले आहे. तसे केले नाही तर कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहक हिताचे सर्व नियम मोडून ग्राहकांवर मनमानी करण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त भावना ग्राहकांमध्ये उमटत आहेत.
मागील महिन्यात शहर परिसरातील असंख्य ग्राहकांना जादा वीजबिल देण्यात आले होते. या ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी त्यांना अगोदर वीजबिल भरण्यास सांगण्यात आले. असंख्य ग्राहकांना यामुळे आर्थिक फटका बसला आहे. अशा त्रुटींबाबत महावितरण मात्र कोणतीही भूमिका घेण्यास तयार नाही. मात्र वीजबिल वसुलीसाठी तत्पर भूमिका घेतली जाते. महावितरणच्या या भूमिकेविषयी शहरात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
ग्राहकविरोधी भूमिका
महावितरणकडून अशाप्रकारे वीज बिल वसुलीची सक्ती केली जात असेल तर हा सुलतानी फतवा म्हटला पाहिजे. वीज कायद्याच्या विरोधात हा निर्णय असून, यामुळे ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली होणार आहे. ग्राहकांना सात दिवसांची पूर्व सूचना देऊनच कारवाई केली जाते. याप्रकरणी वेळीच लक्ष घालून ग्राहकांचे होणारे नुकसान टाळले पाहिजे. संबंधित खात्याचे मंत्री यांनी लक्ष घातलेच पाहिजे. या प्रकरणावरून ग्राहक संघटनांना स्वस्थ बसता येणार नाही. या निर्णयास न्यायालयात आव्हान द्यावे लागेल.
-प्रा. दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ नेते
नियमानुसारच कारवाई
थकीत वीजग्राहकांची जोडणी तोडणे हे अन्यायकारण नव्हे तर नियमित कारवाई आहे. ज्या थकीत वीजग्राहकांना एसएमएसद्वारे बिल भरण्याचे आवाहन केले जाते तीच नोटीस समजली जाते. आता पूर्वीसारखी नोटीस थेट दिली जात नाही. एसएमएसही ग्राह्य धरले जाते. त्यामुळे लिखित नोटीस दिलीच पाहिजे असे नाही. वीज बिल भरणे सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे कारवाई ही होणारच. अकार्यक्षम कर्मचाºयांनाही दंड केला जातो. नियमानुसारच वीजजोडणी तोडली जाते.
-प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता
कर्मचाºयांची नाराजी
विशेष म्हणजे वीजकर्मचारी अशा प्रकारच्या धमकीवजा आदेशामुळे प्रचंड नाराज आहेत. रोजच वीजजोडणी तोडण्याच्या प्रकारामुळे वायरमनला फिल्डवर काम करताना नाहक तणावाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन एकाच गावात काम करीत असताना दांडगाई करून कारवाई केली तर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

Web Title:  Decree to disconnect five electricity customers daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.