कर्तव्यभावनेसह बांधिलकी जपावी : विश्वास नांगरे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:24 AM2019-05-21T00:24:31+5:302019-05-21T00:25:03+5:30
सध्याच्या संस्कृतीत जगताना कर्तव्यनिष्ठेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुसंस्कृतपणाही दाखविला पाहिजे. आपण कुठे मोठे व्हावे आणि कुठे लहान होऊन ज्ञान आत्मसात करावे याचे आत्मभान ठेवले तरी ध्येय निश्चितीची वाट अधिक सोपी होते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
नाशिक : सध्याच्या संस्कृतीत जगताना कर्तव्यनिष्ठेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुसंस्कृतपणाही दाखविला पाहिजे. आपण कुठे मोठे व्हावे आणि कुठे लहान होऊन ज्ञान आत्मसात करावे याचे आत्मभान ठेवले तरी ध्येय निश्चितीची वाट अधिक सोपी होते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
कालिदास कलामंदिर येथे रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने ज्येष्ठ उद्योजक नरेंद्र गोलिया यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयुक्त नांगरे-पाटील बोलत होते. व्यासपीठावर पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र नेहते, रोटरीच अध्यक्ष राधेय येवले, प्रांतपाल राजीव शर्मा, आशा गोलिया, रोटरीच्या सचिव मुग्धा लेले, संतोष साबळे उपस्थित होते. नाशिक शहरात आपल्या कामगिरीचे योगदान देणाऱ्या व्यक्तिला रोटरीच्या वतीने ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी आयुक्त म्हणाले, विद्वान आणि राजा यांची तुलना होऊ शकत नाही. कारण राजा राज्यापुरताच असतो तर विद्वान सर्वत्र पूज्य असतो. कौशल्य आणि संघर्षाने भारलेल्या आयुष्यातही निष्ठेने व्यवसाय आणि कर्तव्याने सामाजिक बांधिलकी जपणाºया गोलिया यांचे आयुष्य हे सर्वांना प्रेरणादायी असेच आहे. नावीन्याचा ध्यास, कौशल्याचा अभ्यास आणि निष्ठेने काम करण्याचे संस्कार जपले तर कोणतेही क्षेत्र तुम्हाला अडथळा वाटत नाही. असे नांगरे-पाटील यावेळी म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र नेहते यांनी केले. विश्वास नांगरे- पाटील यांचा परिचय सचिन बागड यांनी तर नरेंद्र गोलिया यांचा परिचय राजेश राजेबहादूर यांनी करून दिला. सूत्रसंचालन मधुवंती देशपांडे यांनी केले, तर आभार मुग्धा लेले यांनी मानले.
नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे
सत्काराला उत्तर देताना गोलिया म्हणाले, मोठे स्वप्न बाळगा, ते साकार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, नितिमत्ता जोपासली तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. परंतु त्यासाठी आयुष्यात काही तत्त्वांचा स्वीकार केला पाहिजे. शिकण्याची जिद्द, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची कला, नव्याचा स्वीकार, काम करण्याची चिकाटी तसेच प्रामाणिकपणा असेल तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्याला संधी आहे. स्वत:मध्ये बदल करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जगही तुम्हाला सुंदर वाटेल. कारण जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सर्वकाही उपलब्ध आहे ते ओळखता आले पाहिजे, असे गोलिया म्हणाले.