उंबरपाडा (सु) येथील विलगीकरण केंद्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 12:08 AM2021-05-16T00:08:33+5:302021-05-16T00:09:06+5:30
सुरगाणा : येथून जवळच असलेल्या उंबरपाडा (सु) येथील प्रगती माध्यमिक विद्यालयात तयार करण्यात आलेल्या ७२ बेडची सुव्यवस्था असलेल्या विलगीकरण केंद्राचे लोकार्पण सहायक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे यांचे हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी नऊ रूग्ण या नवीन विलगीकरण केंद्रात दाखल झाले.
सुरगाणा : येथून जवळच असलेल्या उंबरपाडा (सु) येथील प्रगती माध्यमिक विद्यालयात तयार करण्यात आलेल्या ७२ बेडची सुव्यवस्था असलेल्या विलगीकरण केंद्राचे लोकार्पण सहायक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे यांचे हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी नऊ रूग्ण या नवीन विलगीकरण केंद्रात दाखल झाले.
होम क्वारंटाईन रूग्णांपासून कोरोना संसर्ग पसरू नये तसेच रूग्णांना तत्पर सेवा मिळावी या उद्देशाने माजी आमदार गावित यांनी उंबरपाडा (सु) येथील त्यांचे विद्यालय विलगीकरण केंद्र म्हणून उपलब्ध करून दिले आहे. पॉझिटिव्ह मात्र होम क्वारंटाईन राहणाऱ्या रूग्णांनी घरी किंवा शेतात जाऊन राहण्याऐवजी उंबरपाडा येथील विलगीकरण केंद्रात दाखल व्हावे यासाठी सर्व सुविधा मोफत दिली आहे. याठिकाणी रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी देखरेख राहणार असून आयुर्वेदिक उपचार देखील केले जाणार आहेत. तसेच एकवेळ नाश्ता, दोन वेळचे जेवण अगदी मोफत दिले जाईल. एक नातेवाईक थांबल्यास त्या व्यक्तीला देखील मोफत जेवण व राहण्याची सोय असणार आहे. शनिवारी (दि.१५) पहिल्याच दिवशी दोन रुग्ण या विलगीकरण केंद्रात दाखल झाले.
कोरोना संसर्ग व त्यावरील लसीबाबत तालुक्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. कोरोना व त्याच्या उपचारासंबंधी माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील. आजार झाल्यास अंधश्रद्धा ठेवून भगत्याकडे जाऊ नका. ते भगत देखील आजारी पडले. कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी. मी गावागावात जाऊन कोरोना संसर्ग व त्यावर उपाय म्हणून निघालेल्या लसीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून तालुक्यात लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जे.पी.गावित यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी डॉ. दिनेश चौधरी, डॉ. कमलेश जाधव, उपसभापती इंद्रजित गावित, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, सावळीराम पवार, उत्तम कडू, संतोष बागुल, सुरेश गवळी, हिरामण गावित, योगेश थोरात, वसंत गवळी, मोहन पवार, अब्बास शेख आदी उपस्थित होते.