लोकार्पण झाले, पण रुग्णवाहिका रस्त्यावर धावलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:15+5:302021-05-26T04:14:15+5:30
कळवण : दहा दिवसांपूर्वी कळवण उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत व तहसीलदार बी. ...
कळवण :
दहा दिवसांपूर्वी कळवण उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत व तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. मात्र, त्या रुग्णवाहिकेची मालेगाव आरटीओ कार्यालयात नोंदणी नसल्यामुळे ती रुग्णांच्या सेवेत अद्याप धावलीच नाही. क्रमांकासाठी प्रशासनाकडून तत्काळ पावले उचलण्यात आली नसल्याने ती आजही उभी आहे.
कळवण व परिसरातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाला अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, ही मागणी अनेक दिवसांपासून होती. आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासह कळवण व सुरगाणा तालुक्याला पहिल्या टप्प्यात तीन रुग्णवाहिका मिळाल्या. उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेची मालेगाव आरटीओ कार्यालयात नोंदणी न झाल्यामुळे ती आज जागेवर उभी आहे. त्यामुळे रुग्णांना मिळेल त्या १०८, खासगी रुग्णवाहिकांतूनच रुग्णांना उपचारासाठी बाहेर ने-आण करावी लागते.
उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने नवीन रुग्णवाहिका मागणीसाठी अनेकदा प्रस्ताव पाठविला; परंतु शासनाकडून नवीन रुग्णवाहिका मिळाली नाही. रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले; त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णसेवेत तत्काळ दाखल करण्यासंदर्भात प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली नाहीत. चालढकलपणा करण्यात आल्यामुळे आरटीओची पासिंग झाली नाही. मालेगाव कार्यालयात कागदपत्रे दाखल केली असून, अद्याप क्रमांक मिळाला नाही. दोन दिवसांत कागदपत्रे जमा करून नोंदणी करता येते; परंतु प्रशासकीय चालढकलपणामुळे दोन दिवसांच्या कामाला यंत्रणेने आठ दिवस लावले. (२५ कळवण ॲम्ब्युलन्स)