सिडको सभापतिपदी दीपक दातीर बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:47 PM2019-07-05T23:47:14+5:302019-07-06T00:17:58+5:30
नाशिक महानगरपालिका सिडको प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दीपक दातीर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सिडको : नाशिक महानगरपालिका सिडको प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दीपक दातीर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी निवडणूक प्रक्रियेत प्रभाग सभापतिपदासाठी शिवसेनेच्या वतीने दीपक दातीर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे दातीर यांची सिडको प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली.
प्रभाग समिती सभापतिपदासाठी शिवसेनेकडून दीपक दातीर, श्यामकुमार साबळे ही दोन नावे चर्चेत होती. मात्र साबळे यांनी अर्जच दाखल न केल्याने सभापतिपदासाठी दातीर यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला होता. माघारीची निर्धारित वेळ समाप्त होताच निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी दीपक दातीर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करताच सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. मावळत्या सभापती हर्षा बडगुजर यांनी सभापतिपदाची सूत्रे नवनिर्वाचित सभापती दातीर यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, अजय बोरस्ते, श्यामकुमार साबळे, कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, किरण दराडे, चंद्रकांत खाडे, रत्नमाला राणे, सुदाम डेमसे, संगीता जाधव यांच्यासह भाजपाचे भाग्यश्री ढोमसे, राकेश दोंदे, नीलेश ठाकरे, छाया देवांग, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड आदी नगरसेवकांसह नगरसचिव आर. आर. गोसावी, विभागीय अधिकारी वाडेकर उपस्थित होते. दीपक दातीर यांंची निवड झाल्यावर त्याचे महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते सभागृहनेते बापू सतीश सोनवणे, विलास शिंदे, जगदीश पाटील, महेश बडवे, दिलीप दातीर, सुभाष गायधनी, बाळा दराडे आदींनी स्वागत केले.
शिवसेनेचेच वर्चस्व
सिडको प्रभाग समितीवर शिवसेनेचे वर्चस्व असून, २४ पैकी १४ सदस्य शिवसेनेचे असल्याने सभापतिपद शिवसेनेकडेच रहाणार असल्याचे स्पष्ट होते. सभागृहात भाजपाची सदस्य संख्या नऊ असून, राष्ट्रवादी काँगेसचा एक सदस्य आहे. त्यामुळे पाचही वर्षी शिवसेनेचाच सभापती रहाणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.