दीपक डोके ला पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:00+5:302021-04-05T04:14:00+5:30
------- नाशिक : रुग्णाला मनपाच्या रुग्णालयात खाटा मिळत नसल्याचा आरोप करत थेट ऑक्सिजन सिलिंडर लावून कोरोनाबधित रुग्णांना मनपाचे मुख्यालय ...
-------
नाशिक : रुग्णाला मनपाच्या रुग्णालयात खाटा मिळत नसल्याचा आरोप करत थेट ऑक्सिजन सिलिंडर लावून कोरोनाबधित रुग्णांना मनपाचे मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावर आणून आंदोलन करणारा कार्यकर्ता दीपक डोके यास सरकारवाडा पोलिसांनी रविवारी अटक केली.
कोरोनाबधित रुग्णाला सार्वजनिक ठिकाणी आणत कोरोना संसर्ग फैलावाचा धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. त्याच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार तसेच मनपा प्रशासनाने केलेल्या आरोपानुसार डोके याने बुधवारी (दि.३१) रोजी सायंकाळी एका कोरोनाबधित रुग्णला रुग्णालयात खाट मिळत नसल्याचा आरोप करत त्यांना ऑक्सिजन सिलेंडरसह मनपा मुख्यालय इमारतीच्या आवारात आणले. यांच्या जीवास धोका निर्माण होईल अशा प्रकारे निष्काळजीपणाचे वर्तन केले. प्रसिद्धीकरिता विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा येथे बोलावून घेतले. कोरोनाबधित रुग्णापासून इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका होऊ शकतो, याची कल्पना असतानाही डोके याने घातकी कृती केल्याचा ठपका पोलिसांकडूनठेवण्यात आला आहे. त्यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्यात डोके विरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच भारतीय दंड विधान कलम २६९, २७० नुसार गुन्हा दाखल केला आहे.