दिपक पाण्डेय यांनी गंगा-गोदावरीला नमन करत स्विकारली पोलीस आयुक्तपदाची सुत्रे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 01:43 PM2020-09-04T13:43:37+5:302020-09-04T13:47:46+5:30
पाण्डेय यांनी नाशकात येताच त्र्यंबकराजाला हात जोडून नमस्कार करत कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बळ दे असेच जणू साकडे घातले असावे.
नाशिक : मुंबई येथून शुक्रवारी (दि.४) भल्या पहाटे नवनियुक्त पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय हे कुंभनगरी व वाईन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशकात दाखल झाले. पाण्डेय यांनी शहरात येताच सर्वप्रथम रामकुंडावर भेट देत गंगा-गोदावरीचे पुजन केले. त्यानंतर आयुक्तालयात हजेरी लावत मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून पदभार स्विकारला.
पाण्डेय हे मुंबईत सुधार सेवा विभागात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कार्यरत होते. ते १९९९ भारतीय पोलीस सेवेच्या तुकडीचे (आयपीएस) अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई, अकोला, राजभवन आदी ठिकाणी सेवा बजावल्या आहेत. नांगरे पाटील यांना मुंबईला सहआयुक्तपदाचा पदभार स्विकारण्यासाठी हजर व्हायचे असल्याने सकाळीच पदग्रहणाची औपचारिकता पुर्ण करण्यात आली. त्यानंतर तत्काळ नांगरे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पाण्डेय यांनी अद्याप दुपारपर्यंत आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. नाशिक पुण्यनगरीत दाखल होताच सर्वप्रथम त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन बाहेरून दर्शन घेत नंतर रामकुंडावर हजेरी लावल्याचे बोलले जात आहे. एकूणच गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी पाण्डेय यांच्याकडून पोलीस बंदोबस्ताबाबतच्या उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. कारण यापुर्वी न्यायालयानेसुध्दा गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. पाण्डेय यांनी नाशकात येताच प्रथम रामकुंडाला भेट दिल्यामुळे आता पुन्हा गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहर पोलीस सरसावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पाण्डेय यांनी नाशकात येताच त्र्यंबकराजाला हात जोडून नमस्कार करत कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बळ दे असेच जणू साकडे घातले असावे. त्यानंतर कुंभमेळ्याचे शाहीस्नान व ध्वजारोहण ज्या दक्षिणगंगा अर्थात गोदावरीच्या पवित्र अशा रामकुं डावर होते, तेथेही भेट देत गोदामाईला नमन केले. एकूणच नवनियुक्त पाण्डेय यांनी शहराच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारण्यापुर्वी धार्मिक पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.