देवगावला विहिरीत सापडले दीर, भावजयीचे मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 01:53 AM2022-04-27T01:53:50+5:302022-04-27T01:54:06+5:30
लासलगाव येथून जवळच असलेल्या देवगाव शिवारातील पोटे वस्तीनजीक एका विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. तो बाहेर काढत असतानाच तेथे अजून एक मृतदेहही सापडला. हे दोघे दीर, भावजय असून, याबाबत पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
लासलगाव : येथून जवळच असलेल्या देवगाव शिवारातील पोटे वस्तीनजीक एका विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. तो बाहेर काढत असतानाच तेथे अजून एक मृतदेहही सापडला. हे दोघे दीर, भावजय असून, याबाबत पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
पोटे वस्तीनजीक एका विहिरीत मंगळवारी सकाळी पायल रमेश पोटे (१९) या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत देवगावचे पोलीसपाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना कळविले असता सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, लहानू धोक्रट, पोलीस नाईक संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याची तयारी सुरू करताच मृत महिलेचे वैजापूर येथील नातेवाईक येईपर्यंत मृतदेह काढण्यास उपस्थितांनी विरोध केला. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह काढण्यात आला. याबाबत राहुल वाघ यांनी कायदेशीर कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
हा मृतदेह काढत असतानाच पाण्यावर पुरुषाच्या चपला तरंगत असल्याचे दिसल्याने विहिरीत अजून कुणी आहे का हे शोधण्यासाठी पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर तेथे दुपारी संदीप एकनाथ पोटे (२७) यांचा गाळात फसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा युवक महिलेचा दीर आहे.
गावातील दोन जणांचे मृतदेह एकाच विहिरीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचा प्रकार आहे की, घातपात याबाबत परिसरामध्ये चर्चा सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती सायंकाळी लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.
इन्फो
आणखी एक मृतदेह
दुसऱ्या घटनेत देवगाव परिसरातील कासली शिवारात मंगळवारी दुपारी एका विहिरीनजीक मोटारसायकल, मोबाइल, चपला आढळून आल्या. त्यानंतर विहिरीच्या पाण्याचा उपसा केला असता प्रणीत दत्तात्रय बोचरे (२२) याचा मृतदेह आढळून आला. लासलगाव पोलीस स्टेशनला याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.