अन्न पाण्याच्या शोधात हरिण, काळवीट मानवी वस्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:51+5:302021-05-28T04:11:51+5:30
ममदापूर : येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर व परिसरात अन्न पाण्याच्या शोधात काळविटे, हरणाची मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात कळपांनी वाटचाल ...
ममदापूर : येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर व परिसरात अन्न पाण्याच्या शोधात काळविटे, हरणाची मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात कळपांनी वाटचाल होताना दिसून येत आहे. राजापूर,ममदापूर परिसरात हरणांना खाण्यासाठी सध्या उन्हाळ्यात जिकडे-तिकडे वाळलेले गवत असल्याने हरिण व काळवीट अन्न पाण्याच्या शोधात उन्हाने तप्त झालेले ढेकळे पायाखाली तुडवत भटकंती करताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याने उन्हाळ्याच्या झळा या तीव्र होताना दिसत आहे. दिवसेंदिवस तुलनेत काळवीट हरणांच्या संख्येत समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी हरणांना व इतर काही जंगली प्राण्यांना चांगल्या प्रकारे पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे .परंतु काही वनक्षेत्रात कुठेच पाण्याची चाहूल लागत नाही त्यामुळे हरिण काळवीट हे सध्या अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात कळपा-कळपाने भटकंती करताना दिसून येत आहेत. राजापूर, ममदापूर वनविभागाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभले असून परिसरात राजापूर, ममदापूर ,रेंडाळे, सोमठाण जोश,खरवंडी देवदरी ,कोळगाव. आदी गावांचा समावेश होतो. परिसरातील गावातील मिळून साडेसात हजार हेक्टरवर असून यापैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर ममदापूर राखीव हा प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये राजापूर, ममदापूर खरवंडी ,सोमठाण जोश ,या पाच गावांचा वनक्षेत्रात समावेश असून प्रत्येक गावात पशुपक्ष्यांना संरक्षणासाठी २०१४ मध्ये पथके निर्माण केली त्यामुळे हरणांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
------------------
काही ठिकाणी सुविधा
राजापूर, ममदापूर व परिसरात हरणांची संख्या ही जास्त असल्याने हरणांना वनविभागाने विविध ठिकाणी पाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. पण काही भागात हरिण पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे जाताना दिसत आहे .आतापर्यंत अनेक हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना इथून मागे बऱ्याच वेळेस घडल्या आहेत. वनविभागाकडून शेतकऱ्यांच्या विहिरींना कठाडे किंवा लोखंडी जाळ्या बसविण्यात याव्या अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे.
---------------------
कृत्रिम पाणवठ्यांची गरज
हरणांना पिण्याच्या पाण्यासाठी वनविभागाने मानवी वस्तीकडे देखील पाणवठे ठेवून वेळोवेळी हरणांना, मोरांना पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. कारण जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातच विहिरी तळ गाठतात. त्यामुळे माणसांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. त्यामुळे वनविभागाने आता जागोजागी कृत्रिम का होईना पाणवठे तयार करून काही ठिकाणी हरणांना पाणी मिळेल अशी सुविधा वनविभागाने करावी अशी मागणी सध्या शेतकरी वर्ग करत आहे. (२७ ममदापूर १/२)
===Photopath===
270521\27nsk_10_27052021_13.jpg
===Caption===
२७ ममदापूर १/२