मृगाने फिरवली पाठ; जिल्ह्यात पेरण्या लांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:09+5:302021-06-16T04:18:09+5:30

भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरी १०४ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय खासगी हवामान संस्था स्कायमेटनेही चांगल्या पावसाचे भाकीत ...

The deer turned the text; Sowing was delayed in the district | मृगाने फिरवली पाठ; जिल्ह्यात पेरण्या लांबल्या

मृगाने फिरवली पाठ; जिल्ह्यात पेरण्या लांबल्या

googlenewsNext

भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरी १०४ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय खासगी हवामान संस्था स्कायमेटनेही चांगल्या पावसाचे भाकीत केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे गांजलेल्या शेतकऱ्यांना पावसाच्या शुभवार्तेने सुखद दिलासा दिला आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने जमिनी भिजल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या भरवशावर पेरण्या सुरू करून दिल्या. मृग नक्षत्राच्या चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असताना मृगाने मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून डोळे वटारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या चिंतारेषा अधिक गडद झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केली आहे. ती वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून कडक ऊन पडत असून, त्याचाही फटका पेरणी केलेल्या क्षेत्राला बसण्याची भीती आहे. मृग नक्षत्राचे पहिले दोन चरण संपुष्टात आले तरी पावसाचा मागमूस दिसत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७ टक्के पाऊस पडलेला आहे. त्यातही देवळा, निफाड व बागलाण या तालुक्यात १० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे. परंतु अन्य तालुक्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

इन्फो

कृषी विभागाकडून समुपदेशन

यंदा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या समुपदेशावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना पेरणीविषयी मार्गदर्शन केले जात आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी करू नये, असा सल्लाही दिला जात आहे. कोरोना महामारीमुळे शेतीशाळा यंदा शक्य नसल्याने ऑनलाइन व प्रत्यक्ष भेटीतून खरिपासाठी मार्गदर्शन सुरू आहे. गतवर्षी बेमोसमी पाऊस, अवकाळी पाऊस, चक्रीवादळे झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. या सर्व संकटांवर मात करीत खरीप पिकांच्या पेरणीसाठी बी-बियाणे, खतांसाठी पैशांची तजवीज करून आता खरेदीसाठी लगबग सुरू आहे.

इन्फो

मका पिकात घट शक्य?

चालूवर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाल्याने सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यामुळे मका पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, सोयाबीनला मागणी वाढल्याने बियाणांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम लागवडीवर होण्याची भीती आहे. बियाण्यांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी स्वतःकडील सोयाबीनचे बियाणे वापरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

फोटो- १४ पेठ १

Web Title: The deer turned the text; Sowing was delayed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.