बाळंतवेदनांतून "तिने" केली हरिणीची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:05 PM2021-06-12T23:05:52+5:302021-06-13T00:15:44+5:30
नगरसूल : येवला तालुक्यातील कोळगाव-ममदापूर शिवाराजवळील तरुळी भागात शेताजवळ गर्भवती असलेल्या हरिणीच्या बाळंतवेदना पाहून मदतीला धावलेल्या एका महिलेने त्यातून तिची सुखरूप सुटका केली; परंतु हरिणीच्या पाडसाचा जीव मात्र वाचवण्यात यश आले नाही.
नगरसूल : येवला तालुक्यातील कोळगाव-ममदापूर शिवाराजवळील तरुळी भागात शेताजवळ गर्भवती असलेल्या हरिणीच्या बाळंतवेदना पाहून मदतीला धावलेल्या एका महिलेने त्यातून तिची सुखरूप सुटका केली; परंतु हरिणीच्या पाडसाचा जीव मात्र वाचवण्यात यश आले नाही.
शेतकरी रमेश शिंदे, त्यांची पत्नी कल्पना, मुलगा अविनाश हे शेतात काम करीत असताना शेताच्या मागील बाजूस काही अंतरावर एक हरिण दिसले. त्या भागात हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शिंदे यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु कल्पना शिंदे यांना सदर हरणाची काही तरी अडचण असल्याचे लक्षात आले व त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता सदर मादी हरिण गर्भवती असल्याने तिला उठता येत नसल्याचे लक्षात आले. कल्पना शिंदे यांनी तिची तडफड पाहून पती व मुलाला मदतीला बोलावले व तिचे अर्धवट अडकलेले पाडस बाहेर काढले. हरिणीचे प्राण वाचले. मात्र, पाडसाने प्राण सोडला. यावेळी हरिणी वेदनेने विव्हळत होती. दरम्यान, वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना सदर घटनेची माहिती भाऊलाल कुडके यांनी दिल्यानंतर काही वेळातच वनविभागाचे कर्मचारी वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती पाहून मृत पाडस जवळच खड्ड्यात पुरले व हरिणीला येवला येथे वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब होन यांच्याकडे उपचारासाठी नेले. त्यावेळी डॉ. होन यांनी तात्काळ औषधोपचार केल्याने हरिणीचा जीव वाचला.
सदर हरिण सुमारे दीड ते दोन तास अर्धवट अवस्थेत पाडस अडकल्याने मृत्यूशी झुंज देत होती; परंतु कल्पना शिंदे यांनी हिंमत दाखवत केलेल्या मदतीमुळे हरिणीचे प्राण वाचले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्पना यांच्यासह या शेतकरी कुटुंबाचे कौतुक केले.
अशा घटना घडतात; पण त्याकडे काही लोक कानाडोळा करतात. शिंदे यांच्या सारख्या लोकांनी प्रसंगावधान राखून घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखल घेतली. हरिण अडलेल्या अवस्थेत पाहून दोन जीव मृत्यूशी झुंज देत असताना शिंदे यांनी धाडस करत हरिणीला जीवदान दिले. दोन दिवस औषधोपचार करून या हरिणीला राजपूत वनसंवर्धन क्षेत्रात सोडण्यात येणार आहे.
- ज्ञानेश्वर वाघ, वनरक्षक, राजापूर.