नाशकात पोटनिवडणुकीवर डोळा ठेवणा-यांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 07:26 PM2017-11-21T19:26:19+5:302017-11-21T19:28:16+5:30
नाशिक : नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी नाशिक महापालिकेच्या महासभेला हजेरी लावल्याने त्यांचे नगरसेवकपद शाबूत राहिल्याने शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द होण्यावर डोळा ठेवून पोट निवडणुकीची तयारी करणा-या इच्छुकांच्या मनसुब्यावर मात्र पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक चारमध्ये मंगळवारी ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण होते.
भारतीय जनता पक्षाकडून हेमंत शेट्टी महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले, परंतु अवघ्या दोन महिन्यांतच त्यांच्यावर खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी शेट्टी यांना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत म्हणजेच तुरुंगात केली होती. मे महिन्यात हा प्रकार घडल्याने तेव्हापासून शेट्टी हे महापालिकेच्या तसेच पंचवटी प्रभागाच्या मासिक सभेत गैरहजर राहिले. महापालिका अधिनियमान्वये एखादा सदस्य सहा महिने सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे. हेमंत शेट्टी हे मे महिन्यापासून गैरहजर असल्यामुळे त्यांचे सदस्य पद रद्द होऊ शकते व त्यानंतर महापालिकेला पोटनिवडणुक घेण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहणार नाही अशी अपेक्षा अनेकांनी बाळगली व त्यादृष्टीने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, खुनाचा कट रचल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या शेट्टी यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, परंतु तो फेटाळण्यात आल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी गेल्या आठवड्यात झाली, न्यायालयाने शेट्टी यांना जामीन मंजूर केला. परंतु न्यायालयीन आदेश हाती न पडल्यामुळे शेट्टी यांची सुटका लांबणीवर पडली. तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्यात महापालिकेने बोलविलेल्या महासभेत शेट्टी यांची हजेरी अनिवार्य असल्याचे कायदेशीर व तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने भाजपाची व विशेष करून शेट्टी समर्थकांची धावपळ उडाली, त्यामुळे शेट्टी यांनी महापालिकेत हजेरी लावू नये यासाठी काही मंडळींनी अक्षरश: देव पाण्यात बुडविले, मात्र उच्च न्यायालयाचा आदेश जरी मिळाला नाही तरी, जिल्हा न्यायालयाने काही वेळासाठी शेट्टी यांना महासभेत हजर राहण्यासाठी मुभा दिल्यामुळे मंगळवारी शेट्टी महासभेत दाखल झाले, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व अबाधित राहिल्याने साºयांचा जीव भांड्यात पडला. तथापि, या निमित्ताने प्रभाग चारमध्ये पोटनिवडणुकीची तयारी करणा-यांचा मात्र हिरमोड झाला. दुसरीकडे शेट्टी याचे पद शाबूत राहिल्याने त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी जल्लोष साजरा केला.