शत्रूच्या मुलखात त्याला पराभूत करणे हेच खरे शौर्य : चारूदत्त आफळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:46 IST2018-03-22T00:46:26+5:302018-03-22T00:46:26+5:30
इतिहासाचा विषय राष्ट्राचा असतो म्हणून इतिहास राष्ट्र घडवितो. प्रभू रामचंद्रांनी पराक्रम केला तो दुसऱ्याने लिहिला, मात्र सावरकर हे स्वत: पराक्रम करायचे व स्वत:च लिहायचे. शत्रूला त्याच्या राजधानीत जाऊन पराभूत करणे हे खरे शौर्य आहे आणि असेच शौर्य प्रभू रामचंद्र व वीर सावरकर या दोघांमध्ये होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी केले.

शत्रूच्या मुलखात त्याला पराभूत करणे हेच खरे शौर्य : चारूदत्त आफळे
पंचवटी : इतिहासाचा विषय राष्ट्राचा असतो म्हणून इतिहास राष्ट्र घडवितो. प्रभू रामचंद्रांनी पराक्रम केला तो दुसऱ्याने लिहिला, मात्र सावरकर हे स्वत: पराक्रम करायचे व स्वत:च लिहायचे. शत्रूला त्याच्या राजधानीत जाऊन पराभूत करणे हे खरे शौर्य आहे आणि असेच शौर्य प्रभू रामचंद्र व वीर सावरकर या दोघांमध्ये होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी केले. श्री काळाराम जन्मोत्सवानिमित्त काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सवात आफळे यांनी ‘रामायण व सावरकरायण’ विषयावर दुसरे पुष्प गुंफले. सावरकर विदेशात नेमके कशासाठी गेले याची कल्पना त्यांच्या पत्नी व बहिणीला नव्हती केवळ दोघा भावंडांना थोडीफार कल्पना होती. सावरकर विदेशात पोहचले हे त्यांच्या कार्यातूनच लोकांना कळते. राम वनवासात असताना भरत, लक्ष्मणाचे जसे सहकार्य लाभले तसेच सहकार्य सावरकरांना ते विदेशात असताना त्यांच्या दोघा भावंडांकडून लाभले. विदेशात असताना सावरकरांनी इटलीच्या जोसेफ मॅझेले याच्यावर चरित्र लिहिले व ते भारतात पाठवून नाशिकला गोंधळेकरांकडे त्याची छपाई केली, असेही ते म्हणाले. यावेळी काळाराम संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांच्यासह विश्वस्त, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.