मातब्बर पुढाऱ्यांचा हिरमोड
By admin | Published: January 28, 2017 12:53 AM2017-01-28T00:53:03+5:302017-01-28T00:53:15+5:30
महिलांसाठी राखीव : गणाकडे तालुक्याचे लक्ष
किशोर इंदोरकर मालेगाव कॅम्प
तालुक्यातील झोडगे गटातील झोडगे गण यंदा सर्वसाधारण महिला राखीव झालेला आहे. त्यामुळे मातब्बर पुढाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. आपल्या धर्मपत्नींना निवडणूक रिंगणात उभे करण्याचा प्रयत्नात अनेक नेते आहेत.
माळमाथ्यावरील झोडगे गणात सुमारे १२ हजार मतदार आहेत. यात प्रामुख्याने सुमारे मराठा समाज पाच हजार, जाट समाज तीन हजार, राजपूत दोन हजार व इतर अशा संख्येने मतदार आहे. येथे मराठा समाजाचे प्राबल्य असले तरी स्थानिक राजकारणामुळे मतांची विभागणी झाल्यास मराठा उमेदवारास याचा फटका बसू शकतो. त्या पाठोपाठ जाट व राजपूत समाजाचे एकगठ्ठा मतदान निकालाचा कौल फिरवू शकतात, असे राजकीय जाणकार सांगतात. या गणात धर्मराज पवार हे सेनेचे आहेत व यापूर्वी जनराज्य आघाडीच्या उमेदवारांनी येथे बाजी मारली होती. पवार यांनी गतवेळेस जनराज्याचे विजय देसाई यांचा पराभव केला होता.
धर्मराज पवार यांच्या कालावधीत वसुंधरा योजनेंतर्गत नाला, सिमेंट प्लग नाला खोलीकरण, बंधारा दुरुस्ती आदि ३७ बंधाऱ्यांची कामे प्रामुख्याने झाली. गणातील गावांमध्ये भारत निर्माण, माळमाथा पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. झोडगे गण सर्वसाधारण स्त्री राखीव झाल्याने माळमाथ्यावरील अनेक इच्छुक आपल्या सहचारीनींना मैदानात उतरवून नशीब आजमवणार आहेत. त्यामुळे या गणाकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे.