अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:50 AM2018-04-03T01:50:21+5:302018-04-03T01:50:21+5:30
अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोपरगाव तालुक्यातील तिघा संशयितांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे परत न करता या त्रिकुटाने नाशिकमधील द्वारका परिसरात बोगस कंपनीची स्थापना करून नाशिककरांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे़
नाशिक : अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोपरगाव तालुक्यातील तिघा संशयितांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे परत न करता या त्रिकुटाने नाशिकमधील द्वारका परिसरात बोगस कंपनीची स्थापना करून नाशिककरांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे़ या फसवणूक प्रकरणी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथील गुंतवणूकदारांनी सोमवारी (दि़२) भद्रकाली पोलिसांची भेट घेऊन लेखी तक्रार केली असून, चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे़ पुणे जिल्ह्णातील विठ्ठल धुमाळ यांनी भद्रकाली पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार संशयित प्रवीण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुखदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी (रा. संवत्सर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) जानेवारी २०१६ मध्ये संशयित वरगुडे हे चिंचोली मोराची येथे आले व व्हिनस कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास वर्षभरात दामदुप्पट परतावा मिळणार असल्याचे सांगितले़ यावर विश्वास ठेवून गुंतवणूकदार विठ्ठल धुमाळ यांच्यासह निवृत्ती व्यंकटराव धुमाळ, सावळा विठ्ठल धुमाळ, दीपाली सावळा धुमाळ, विकास निवृत्ती धुमाळ, स्वप्निल विठ्ठल धुमाळ, दादाभाऊ रघुनाथ पोखरकर, दत्तात्रय जयवंत उबाळे, निर्मला भाऊसाहेब धुमाळ, रामदास पोपट धुमाळ, दत्तात्रय दादाभाऊ बरबटे, किरण बाजीराव धुमाळ, मच्छिंद्र साकोरे, बाळासाहेब रामभाऊ नाणेकर, महादेव सुभाष फंड, प्रमोद महादेव मोरे यांनी सुमारे २ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांना रकमेच्या मोबदल्यात व्हिनस कॅपिटल सर्व्हिसेस, साई प्रणव सर्व्हिसेस या नावाने क्रेडिट व्हाऊचर्स दिले व वर्ष संपण्यापूर्वी धनादेश देण्यात आले, मात्र धनादेश बॅँकेत टाकण्यापूर्वी पुन्हा परत घेत पुढील वर्षाचे धनादेश देण्यात आले़ विशेष म्हणजे आता तर गुंतवणूकदारांना एप्रिल २०१८ चे धनादेश देत फसवणूक केली आहे. दरम्यान, या संशयितांनी कोपरगावमध्येही अनेकांची फसवणूक केली असून गत काही दिवसांपासून द्वारका परिसरातील बोडके प्लाझामध्ये ‘सक्सेस ट्री फार्म’ नावाने बोगस कंपनी सुरू केली आहे़ गुंतवणूकदारांना संचालकांची माहिती मिळताच त्यांनी आपल्या रकमेची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे़