सदोष वार्षिक ताळेबंद, सनदी लेखापालची गच्छंती
By admin | Published: November 12, 2016 11:46 PM2016-11-12T23:46:18+5:302016-11-13T00:02:18+5:30
महापालिका : नवीन नियुक्तीची प्रक्रिया सुरू
नाशिक : महापालिकेचा सदोष वार्षिक ताळेबंद सादर केल्याप्रकरणी सनदी लेखापालला दिलेले कंत्राट आयुक्तांनी रद्दबातल ठरविले असून, नव्याने नियुक्तीसाठी निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. सुमारे आठ वर्षांपासून करण्यात येणाऱ्या द्विनोंद लेखापद्धतीचे कामकाज सदोष आढळून आल्याने आयुक्तांनी सदर कारवाई केली आहे.
महापालिकेने एप्रिल २००७ पासून एस. एस. मुथा या सनदी लेखापालास द्विनोंद लेखापद्धतीनुसार वार्षिक ताळेबंद सादर करण्याचे कंत्राट दिले होते. सदर लेखापालने सुरुवातीच्या काही वर्षांचे ताळेबंद सादर केले, परंतु त्यांची त्रयस्थ एजन्सीमार्फत पडताळणी केली असता त्यात अनेक त्रुटी-दोष आढळून आले. त्यामुळे मुथा यांना महापालिकेने वेळोवेळी समज देऊन संधीही देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कामकाज करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे विलंब होत गेला. परिणामी, महापालिकेचे गेल्या ८ ते ९ वर्षांपासून द्विनोंद लेखापद्धतीनुसार वार्षिक ताळेबंदचे कामच झालेले नाही. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबत गंभीर दखल घेत दि. २८ आॅक्टोबर रोजी आदेश पारीत करत एस. एस. मुथा यांचे कंत्राट रद्द केले आणि त्यांची गच्छंती केली. याशिवाय त्यांची अनामत रक्कम जप्त करण्याचीही कारवाई केली. आता महापालिकेने द्विनोंद लेखापद्धतीनुसार वार्षिक ताळेबंदचे काम करण्यास नवीन सनदी लेखापाल नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध केली आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून महापालिकेचे काम द्विनोंद लेखापद्धतीविना होत असल्याने एकूणच आर्थिक कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)