लाचखोर अभियंत्यांची नाशिकरोड कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:43 AM2017-10-18T00:43:36+5:302017-10-18T00:43:41+5:30
शासकीय ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांना मंगळवारी (दि़१७) जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ पी़ देशमुख यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली़ या तिघांचीही नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली असून, न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत़
नाशिक : शासकीय ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांना मंगळवारी (दि़१७) जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ पी़ देशमुख यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली़ या तिघांचीही नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली असून, न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय ठेकेदार युवराज मोहिते यांनी पूर्ण केलेल्या रस्ता दुरुस्ती कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१२) रंगेहाथ पकडले़ शनिवारी (दि़१३) या तिघांना न्यायालयात हजर केले असता मंगळवार (दि़१७) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ घरझडती व पोलीस कोठडीतील कालावधीत या तिघांकडून २२ लाख ४६ हजार १९४ रुपयांची मालमत्ता त्यामध्ये सोने, चांदी व रोख रक्कम शोधून काढण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश मिळाले़ अभियंता पवार यांच्या घरझडतीत रोख रक्कम व सोने असा आठ लाख २० हजार ६९४ रुपयांचा, पाटील यांच्या घरझडतीत रोख रक्कम व सोने असा सहा लाख सात हजार ४५० रुपयांचा, तर देशपांडे यांच्या घरझडतीत ८ लाख ७ हजार ९३३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला़ मंगळवारी या तिघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़ यानंतर सायंकाळी वैद्यकीय तपासणीनंतर या तिघांचीही रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली़ त्यांच्या वकिलांनी त्यांचे जामीन अर्ज न्यायालयात सादर केले़
वकिलांच्या युक्तिवादानंतर जामिनावर निर्णय
या लाचखोर अभियंत्यांची लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणारे तक्रारदार मोहिते यांच्यावर दबाव आणून धमकी दिली जात असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांकडे केली आहे़ याबरोबरच पोलीस संरक्षणाची मागणीही केली आहे़ या तिघांचेही जामीन अर्ज न्यायालयास सादर करण्यात आले असून, त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जबाब तसेच आरोपी व बचाव पक्षाच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालय निर्णय घेणार आहे़ त्यामुळे या तिन्ही अभियंत्यांची दिवाळी कारागृहात होणार, अशी चर्चा आहे़