‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ नाशकातच राहणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 01:20 AM2018-11-19T01:20:07+5:302018-11-19T01:20:25+5:30
देशातील संशोधनाला चालना मिळावी व संरक्षण खाते स्वदेशी व्हावे, या उद्देशाने भारतात दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब साकारण्यात येणार आहे. हे इनोव्हेशन हब नाशिकमधून कोठेही पळविण्यात आलेले नाही तर ते नाशकातच साकारले जाईल, असा दावा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केला.
नाशिक : देशातील संशोधनाला चालना मिळावी व संरक्षण खाते स्वदेशी व्हावे, या उद्देशाने भारतात दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब साकारण्यात येणार आहे. हे इनोव्हेशन हब नाशिकमधून कोठेही पळविण्यात आलेले नाही तर ते नाशकातच साकारले जाईल, असा दावा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केला.
शहरात रविवारी (दि.१८) एका सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भामरे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकारकडून कोईम्बतूरनंतर दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब साकारण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा दरम्यानच्या काळात सुरू झाल्या होत्या. नाशिकमध्ये होऊ घातलेला हा संरक्षण खात्याचा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या शहरात हलविण्यात आल्याचे बोलले जात होते. त्यामुळे नाशिकला पुन्हा ठेंगा दाखविला गेला की काय? अशी शंका घेतली जात होती.
डिफेन्स हब हे राज्यातील पाच शहरांमध्ये होणार असल्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी भामरे यांनी केली होती. नाशिकमध्ये मागील जून महिन्यात संरक्षण व हवाई उत्पादनांची संधी याविषयावर चर्चासत्राचे नियोजन करण्यात आले होते व त्याच पार्श्वभूमीवर भामरे यांनी पत्रकार परिषदेत या घोषणा केल्या होत्या; मात्र हे चर्चासत्रही काही कारणास्तव रद्द करण्यात आले. त्यानंतर डिफेन्स इनोव्हेशन हब हे नाशिकऐवजी नागपूरला साकारले जाणार या चर्चेला तोंड फुटले. याबाबात रविवारी भामरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी नागूपरला इनोव्हेशन हब हलविल्याची माहिती चुकीची असल्याचा खुलासा केला. हा प्रकल्प नागपूर नव्हे तर नाशिकमध्येच आकारास येईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
डिफेन्स हब नाशिकला आकारास येणार असल्याचा दावा भामरे यांनी केल्यामुळे येथील सूक्ष्म व लघु उद्योगांना ‘अच्छे दिन’ येतील अशा आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. संरक्षण खात्याशी संबंधित नसलेल्या उद्योगांनाही याचा फायदा होणार आहे. संरक्षण खात्यामध्ये नावीन्यपूर्ण स्वदेशी संशोधनाला वाव मिळावा जेणेकरुन शस्त्रास्त्रे व अत्याधुनिक उपकरणे कमी प्रमाणात आयात करावी लागतील हा यामागील उद्देश आहे.
पंधरा दिवसांत कार्यक्रमाचे नियोजन
सप्टेंबरमध्ये भामरे यांनी डिफेन्स इनोव्हेशन हब संदर्भात अवघ्या एका महिन्यात कार्यंक्रम आयोजित करुन घोषणा केली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी रविवारी पुन्हा या आश्वासनाचा कालावधी कमी करुन अवघ्या पंधरा दिवसांतच यासंदर्भात कार्यक्रम आयोजित केला जाईल व त्यामध्ये अधिकृत घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले.