देवळालीकरांना संसरीत अंत्यसंस्काराला ग्रामस्थांचा नकार
By श्याम बागुल | Published: September 9, 2018 04:43 PM2018-09-09T16:43:00+5:302018-09-09T16:44:43+5:30
देवळाली कँम्पच्या नागरीकांंच्या अंत्यविधीसाठी संसरीगावच्या दारणातीरी असलेल्या स्मशानभूमी जवळ पडते. त्यामुळे देवळालीच्या नागरिकांसाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्याऐवजी संसरी गावालगत स्मशानभूमीचा वापर केला जातो
नाशिक : देवळाली कँम्प परिसरातील नागरिकांना दारणातिरी संसरी गावातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार न करू देण्याचा ठराव संसरी ग्रामपंचायतीने केला असून, त्यामुळे आगामी काळात कॅम्पवासियांना मरणोत्तर विधीसाठी खडतर मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
देवळाली कँम्पच्या नागरीकांंच्या अंत्यविधीसाठी संसरीगावच्या दारणातीरी असलेल्या स्मशानभूमी जवळ पडते. त्यामुळे देवळालीच्या नागरिकांसाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्याऐवजी संसरी गावालगत स्मशानभूमीचा वापर केला जातो. उत्तर विधीनंतर संसरीच्या स्मशानभूमीची स्वच्छता न करतात रस्ताने परततांना विधीच्या राहिलेल्या वस्तु व साहित्य संबंधितांकडून टाकून दिले जाते. या संदर्भात संसरी ग्रामपंचायतीने चार वर्षांपासून कँन्टोमेंन्ट प्रशासनाशी पत्रव्यवहार करून त्यांचे लक्ष वेधले व संसरीच्या स्मशानभुमीचा देवळाली वासियांकडून होत असलेल्या वापरामुळे तिची स्वच्छता व देखभाल केली जावी अशी मागणी केली. परंतु कॅन्टोंमेट प्रशासनाने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याने या पुढे देवलालीच्या नागरीकाना गावात अंत्यविधी करण्यास ग्रामस्थांनी विरोध करत कँन्टोमेंन्ट प्रशासनाने बांंधलेली स्मशानभूमीचा वापर करावा असा ठराव केला. संसरी गावात स्मशानभूमीत देवळालीवासियांना अंतिम संस्कार करता येणार नसून, केल्यानंतर ग्रामपंचायतीकडून मृत्युचा दाखलाच न देण्याचाही उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. शिवाय यापुढे अंत्यविधीसाठी लाकडे किंवा मृत्यु दाखला ग्रामपंचायतीच्या वतीने न देण्याचेही ठरविण्यात आले आहे.
........................................................................
चौकट===
कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांकडून स्मशानभुमीची पाहणी
संसरी ग्रामपंचायतीने स्मशानभुमीचा वापर करू देण्यास नकार दिल्याने कॅन्टोंमेंटच्या नगरसेवकांसह लष्करी पदाधिकारींंनी स्मशानभुमीची पाहणी केली. जुन्या स्टेशन जवळील रेल्वे केबिन जवळील पुला खालून रस्ता तयार करून नवीन स्टेशनवाडी भागातून कॅन्टोन्मेंट नदी किनारी नवीन स्मशान भूमी उभारली जाऊ शकते का याबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वेच्या परवानगीने या मार्गावरून मोठी वाहने देखील जाऊ शकतात ही बाब अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याबाबत सर्व अहवाल तयार करून बोर्डाच्या आगामी बैठकीत ठेवण्याचे व त्यावर अंतिम निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडियर पी.रमेश, उपाध्यक्ष मीना करंजकर, नगरसेवक दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार,अभियंता विलास पाटील,माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर,राजू ठाकूर उपस्थित होते.