आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
By admin | Published: January 14, 2016 10:27 PM2016-01-14T22:27:11+5:302016-01-14T22:30:09+5:30
दोडी ग्रामीण रुग्णालय : एक पद रिक्त, तर दोन वैद्यकीय अधिकारी गेले काम सोडून
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात एकमेव असणाऱ्या दोडी ग्रामीण रुग्णालयात चारपैकी केवळ एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम करताना कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होण्यासह आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकाराची शासनाने त्वरित दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर व तालुक्यात एकमेव ग्रामीण रुग्णालय दोडी बुद्रुक येथे कार्यरत आहे. ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. सध्या येथे डॉ. सी. ए. पाटील नामक केवळ एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून त्यांच्याकडेच जुलै महिन्यापासून वैद्यकीय अधीक्षकांचा अतिरिक्त पदभार आहे.
वैद्यकीय अधीक्षक पद सहा महिन्यांपासून रिक्त असून दोन वैद्यकीय अधिकारी आठवड्याभरापासून कार्यरत नाही. त्यामुळे चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम केवळ एकाला करावे लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयात दररोज रुग्ण तपासणीसाठी मोठी गर्दी असते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, बाळंतपण, सर्पदंश, विषबाधा, श्वानदंश, अपघात व इतर रुग्ण, शालेय आरोग्य तपासणी व विविध आरोग्य शिबिरे घेण्यात येतात. त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याला २४ तास सर्व कामे करणे शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळे साहजिकच वैद्यकीय व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
दैनिक तपासणी करण्यासह दोडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येते. सिन्नर एमआयडीसी व वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातात ठार होणाऱ्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयातच आणण्यात येते. त्यामुळे सर्वच आघाड्यांवर एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कामे सांभाळणे शक्य नसल्याचे दिसते. नाशिक-पुणे महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त असून १०८ रुग्णवाहिका असल्याने जखमी रुग्ण प्राथमिक उपचारासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात आणले जातात. या पार्श्वभूमीवर येथे गैरसोय निर्माण होते. डॉ. पाटील यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकाचा अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना रुग्ण तपासणीसह विविध बैठकांना सिन्नर व नाशिक येथे हजर राहावे लागते. दररोज सुमारे १५० रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होते.
उपचारासाठी रुग्ण दवाखान्यात अॅडमिट असतात. पोलिसांकडून वैद्यकीय तपासणीसाठी संशयित आरोपींना आणले जाते. केवळ एका वैद्यकीय अधिकाऱ्यामुळे वैद्यकीय यंत्रणा कोलमडली असल्याचे चित्र आहे. दोडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्ते पदे तत्काळ भरण्याची मागणी सरपंच लीलाबाई सांगळे, उपसरपंच सुदाम वाघचौरे, गणपत केदार, रघुनाथ आव्हाड, शरद शिंदे, सखाराम दराडे, ज्ञानेश्वर आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)