अग्नी आखाड्याचे श्रीमहंत गोपालानंद यांचे देहावसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:20 PM2018-10-02T16:20:15+5:302018-10-02T16:23:38+5:30
११७ व्या अखेरचा श्वास : त्र्यंबकेश्वर येथे आखाड्यांकडून श्रद्धांजली
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्यात अखाडा परिषदेच्या निर्णयात महत्वाची भुमिका निभावणारे श्री अग्नी आखाड्याचे सभापती श्रीमहंत गोपालानंद ब्रम्हचारी यांनी वयाच्या ११७ व्या वर्षी जुनागढ, बिलखा येथे अखेरचा श्वास घेतला. त्र्यंबकेश्वर येथील दहाही आखाड्यांच्यावतीने श्रीमहंत गोपालानंद ब्रह्मचारी यांना आदरांजली वाहण्यात आली.
श्रीमहंत गोपालानंद गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्र्यंबकेश्वर मधील दहाही आखाड्यांच्या महंतांनी त्यांच्या प्रकृतीस आराम पडावा म्हणून भगवान त्र्यंबकराज, उज्जैनचे भगवान महाकालेश्वर याठिकाणी महामृत्युंजय जाप करु न प्रार्थना केली होती. श्रीपंचायती जुना आखाड्यासमवेत त्यांची सिंहस्थ शाहीस्नान करण्याची परंपरा आहे, त्या आखाड्याचे संरक्षक महंत तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरिगिरीजी महाराज हे जुनागढ बिलखा येथे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत होते. श्रीमहंत ब्रह्मलीन झाल्याची वार्ता येताच त्र्यंबकेश्वर येथील दहाही आखाड्यांच्या साधुमहंतांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती, अटल आखाड्याचे महंत उदयगरी महाराज, जुना आखाड्याचे महंत विष्णु गिरी, अरु ण भारती, सुखदेव गिरी, आनंद आखाड्याचे महंत धनराजगिरी महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे महंत शिवनारायण पुरी, उदासिन नयाचे महंत विचारदास महाराज तसेच आवाहन उदासिन बडा आदी आखाड्याचे महंत उपस्थित होते.
स्मृतींना दिला उजाळा
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथील श्रीपंचायती अग्नी आखाड्याची इमारत मोडकळीस आली होती. या पाशवभूमीवर सभापती महंत गोपालानंद ब्रम्हचारी व सचिव महंत गोविंदानंद ब्रम्हचारी यांनी नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या दोन-तीन महिन्यात नवीन व आकर्षक अशा सुंदर इमारती बांधण्यात आल्या. याबरोबरच अग्नी आखाड्याची इष्ट देवता वेदमाता गायत्री मातेचे देखील सुंदर मंदिर उभारण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले.