अंदाजपत्रकाला विलंब, स्थायी समितीत निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:39 AM2018-03-01T01:39:06+5:302018-03-01T01:39:06+5:30
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वी स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश देऊनही अद्याप ते सादर न झाल्याने सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला.
नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वी स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश देऊनही अद्याप ते सादर न झाल्याने सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. महापालिका स्थायी समितीची सभा सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सभापती गांगुर्डे यांनी स्थायी समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत संपली तरी आयुक्तांचे अंदाजपत्रक स्थायीला सादर का झाले नाही, असा सवाल मुख्य लेखाधिकाºयांना केला. गांगुर्डे म्हणाले, स्थायी समितीने यंदा अभ्यास करण्यासाठी अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वीच सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, स्थायीच्या आदेशाला काहीच किंमत दिली गेली नसल्याबद्दल त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी नूतन आयुक्तांनी पदभार स्वीकारल्याने त्यांना अंदाजपत्रकात काही सुधारणा करायच्या आहेत त्यामुळे अंदाजपत्रकाला उशीर झाल्याचे सांगितले, तर मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांनी येत्या ६ ते ७ मार्चला अंदाजपत्रक स्थायीला सादर केले जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु, या उत्तराने समाधान न झालेल्या सभापतींनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. प्रशासनाने चांगला पायंडा पाडण्याच्या कामात खोडा घातल्याचा आरोपही सभापती गांगुर्डे यांनी केला.
मागच्याच आयुक्तांचे अंदाजपत्रक का नाही ?
सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी मुख्य लेखाधिकाºयांना अंदाजपत्रक कधीपर्यंत सादर करायचे असते आणि त्याचे नियम काय आहेत, याची विचारणा केली. परंतु भोर यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. यावेळी सभापतींनी मागच्याच आयुक्तांचे अंदाजपत्रक सादर करून नवीन आयुक्तांना पुरवणी दाखल करून त्यांच्या संकल्पना मांडता आल्या असत्या, असे सांगत विलंब झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.