विजेचे खांब हटविण्यास मनपाकडून विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:56 AM2018-04-03T00:56:40+5:302018-04-03T00:56:40+5:30
महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडीने कार्यवाही केली आहे. महावितरणने दीड वर्षांपूर्वी खांब व वाहिन्या स्थलांतरित करण्याच्या कामाला मंजुरी व कामासाठीचे कोटेशन दिले.
नाशिक : महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडीने कार्यवाही केली आहे. महावितरणने दीड वर्षांपूर्वी खांब व वाहिन्या स्थलांतरित करण्याच्या कामाला मंजुरी व कामासाठीचे कोटेशन दिले. सादर काम महापालिकेकडून प्रलंबित असून, महावितरणने या कामाबाबतची कार्यवाही पूर्वीच पूर्ण केल्याची माहिती नाशिक शहर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी दिली. कॅनॉलरोडचे रंदीकरणामुळे पूर्वी रस्त्याच्या बाजूला असणारे विजेचे खांब रस्त्यात आले आहेत. याठिकाणी ११/३३ किलोव्होल्टच्या प्रेस, मोटवानी आणि एमइएस या तीन उच्चदाब वाहिन्या आहेत. महापालिका हद्दीत नवीन रस्त्याचे काम किंवा रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्यात येणाऱ्या वीज वाहिन्या व खांब महापालिकेकडून स्वखर्चाने रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येतात. त्यानुसार कॅनॉलरोडच्या रुंदीकरणाचे काम झाल्यानंतर महापालिकेने महावितरणच्या नाशिक शहर उपविभागीय कार्यालयाकडे दि. १६ जुलै रोजी स्वखर्चाने वीज वाहिन्या स्थलांतरित करण्याबाबतचा अर्ज केला. महापालिकेकडून प्राप्त अर्जानुसार उपविभागीय कार्यालयाने तिन्ही वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचे अंदाजपत्रक तयार केले. विभागीय कार्यालयामार्फत कामाचे अंदाजपत्रक मंडळ कार्यालयाकडे पाठविण्यात आले. मंडळ कार्यालयाने तिन्ही अंदाजपत्रकांना अनुक्र मे १२ व १९ सप्टेंबर आणि २९ आॅक्टोबर रोजी मंजुरी दिली.
कार्यवाही होणे आवश्यक
विभागीय कार्यालयाकडून मंजूर कामाचे कोटेशनही त्याचवेळी देण्यात आले. वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत महावितरणने आपल्या स्तरावरील कार्यवाही त्याचवेळी तातडीने पार पाडली असून, पुढील कार्यवाही महापालिकेच्या स्तरावरून होणे आवश्यक असल्याचे थोरात यांनी सांगितले.