रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:02 AM2019-07-09T01:02:25+5:302019-07-09T01:02:49+5:30
गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर जुने नाशिक भागातील काही ठिकाणी वाड्यांच्या भिंती कोसळल्याने आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती.
नाशिक : गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर जुने नाशिक भागातील काही ठिकाणी वाड्यांच्या भिंती कोसळल्याने आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती. अशा परिस्थितीत पडलेली झाडे तोडण्यासाठी ठेकेदाराकडे असलेले मनुष्यबळ इतर आपत्कालीन कामांमध्ये अडकून पडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर तासन्तास झाडे तशीच पडून होती.
पावसाळ्यात रस्त्यावर पडलेली तसेच धोकादायक स्थितीतील झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रविवारी शहर परिसरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे साहजिकच ठेकेदाराच्या यंत्रणेकडूनच रस्त्यावर आडवी पडलेली झाडे तोडण्यासाठी लाकूडतोड्यांची मदत घ्यावी लागते. मात्र शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे ठेकेदाराकडील लाकूड तोडणारी माणसे कामात अडकली असल्यामुळे शहराती काही भागांत पोहचण्यात काहीसा विलंब झाल्याने तासंतास झाडे पडून होती. त्यामुळे अशा मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. उपनगर येथील म्हसोबा मंदिरासमोर पडलेल्या झाडामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता. परंतु जोपर्यंत कर्मचारी झाड तोडण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत वाट पाहाण्याशिवाय पर्याय नव्हता. ठेकेदाराकडील लाकूड तोडणारी माणसे जुने नाशिकमधील आपत्कालीन कामात अडकल्याने झाड बाजूला करण्यास विलंब झाल्याचे नगरसेविका सुषमा पगारे यांनी सांगितले. दोन तासांनंतर रस्ता मोकळा करण्यात आला.
देवळालीगाव मालधक्का रोड येथेही एका टपरीवर झाड पडल्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अर्ध्यातासात अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले मात्र झाड तोडून बाजूला करणे गरजेचे असल्याने लाकूड तोडणारे कामगार उपलब्ध झाले नसल्याने सोमवारी सकाळपर्यंतही झाड तसेच पडून असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.
दिवसभर कामे सुरू
रविवारी शहरातील अनेक भागांत झाडे उन्मळून पडली असली तरी दिवसभर सुरू असलेला पाऊस आणि रात्र झाल्यामुळे अनेक ठिकाणची कामे होऊ शकली नसली तरी सोमवारी सकाळपासून मात्र लाकूड तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर कामे सुरू करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी सकाळपासूनच कामाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक मार्ग मोकळे होऊ शकले तर धोकादायक स्थितीत संरक्षक भिंतींवर तसेच टपºयांवर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.