गोदावरी एक्स्प्रेसला विलंब; प्रवाशांचे हाल
By admin | Published: July 10, 2017 12:53 AM2017-07-10T00:53:39+5:302017-07-10T00:53:53+5:30
नाशिकरोड : तांत्रिक बिघाड झाल्याने गोदावरी एक्स्प्रेस व इतर गाड्या दीड ते तीन तास उशिराने धावल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये शुक्रवारी सकाळी ओढा-नाशिकरोड दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस व इतर लांब पल्ल्याच्या गाड्या दीड ते तीन तास उशिराने धावल्या. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी आपल्या निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने धावत होती. ओढा रेल्वेस्थानक सोडल्यानंतर वाराणसी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर असलेल्या मालगाडीचे इंजिन पाठवून वाराणसी एक्स्प्रेस दीड तास उशिराने १०.५० च्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येऊन पुढे रवाना झाली. यामुळे मनमाडहून एलटीटीला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा दीड तास उशिराने ११ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आली. गोदावरी एक्स्प्रेसला दीड तासाचा उशीर झाल्याने दररोज मुंबई-ठाण्याला जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी आजचा प्रवास रद्द केला होता.महानगरी, शताब्दी, भुवनेश्वर-एलटीटी या गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावल्या. तर आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असलेली मंगला एक्स्प्रेस साडेपाच तास, रांची-एलटीटी एक्स्प्रेस सव्वाचार तास, जनता एक्स्प्रेस साडेचार तास उशिराने धावत होती. यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप व त्रास सहन करावा लागला. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे उशिराने धावत असल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक गर्दीने फुलून गेले होते.