पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करण्यास दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:30+5:302021-05-18T04:14:30+5:30
पंचवटीत दरवर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी गटार, नाले तुडुंब भरून पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते, तर काही ठिकाणी साचते. कधी कधी ...
पंचवटीत दरवर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी गटार, नाले तुडुंब भरून पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते, तर काही ठिकाणी साचते. कधी कधी नागरिकांच्या घरात शिरते. गावठाण व झोपडपट्टी भागात अशी परिस्थिती असली तरी मात्र त्याकडे मनपा संबंधित विभागाचे लक्ष जात नाही. प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांना जोरदार पाऊस झाल्यास धोका कायम संभावतो. दाट लोकवस्ती व गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीत असलेल्या गजानन चौक, दिंडोरी नाका, गणेशवाडी, हिरावाडी, अयोध्यानगरी, भाजी मंडईसमोरील रस्ता, निमाणी बसस्थानकसमोरचा रस्ता, जुना आडगाव नाका रस्त्यावर तसेच हिरावाडी या भागात दरवर्षीच पावसाचे पाणी साचते. रस्त्यावर व मोकळ्या भूखंडावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते.
महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना पुढच्या वर्षी पाणी साचणार नाही असे आश्वासन दिले जाते, मात्र पावसाळा सुरू झाल्यावर पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यास अधिकारी घटनास्थळी येण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यास नागरिकांना स्वतः नाइलाजास्तव साचलेल्या पाण्यात उतरून, तर कधी गटारावरील ढापे बाजूला सारण्यापासून नाल्यात साचलेला कचरा काढण्याचे काम करावे लागते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई करणे गरजेचे असते. पावसाळा सुरू व्हायला अजून १५ दिवस कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच नालेसफाई काम सुरू करणे गरजेचे आहे.