कृषिविषयक योजनांना विलंबाचा ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:23 AM2020-12-05T04:23:30+5:302020-12-05T04:23:30+5:30
नाशिक : शेती आणि शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेकविध योजना राबविल्या जातात; परंतु कृषिविषयक योजना वेळेत पूर्ण होत ...
नाशिक : शेती आणि शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेकविध योजना राबविल्या जातात; परंतु कृषिविषयक योजना वेळेत पूर्ण होत नसल्याने अनेकदा शासनाकडे निधी परत जाण्याची नामुष्की ओढावते. गावपातळीवर तर योजनांची माहिती कित्येकदा स्थानिक लोकप्रतिनिधींनादेखील दिली जात नाही. स्थानिकांचा सहभाग नसल्यानेही अंमलबजावणीत योजना फसण्याचे प्रकार घडत असल्याचे निरीक्षण नोंदवत खासदारांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाविकास समन्वय व सनियंत्रण (दीक्षा समिती) समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, भारती पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्ज्वला भावके, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक संजीव पडवळ आदी उपस्थित होते. प्रारंभी कृषी अधीक्षक जीव पडवळ यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी यांत्रिकीकरण, परंपरागत कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय खाद्यसुरक्षा कार्यान्वयन आणि मृदा स्वस्थ कार्ड या योजनांचा लेखाजोखा सादर केला.
दीक्षा समितीच्या मागील बैठकीत वेळेअभावी कृषी विभागाचा आढावा घेण्यात आला नव्हता. त्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी करणे गरजेचे आहे. कृषी विभागामार्फत प्रत्येक योजना गावपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. मात्र त्यांनाच अनेकदा योजनांची माहिती दिली जात नाही किंवा सामावून घेतले जात नाही. वास्तविक गाव तसेच तालुकापातळीवरील सर्वच लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी लोकप्रतिनिधींना कृषी योजना अंमलबजावणीच्या कामात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाविकास समन्वय व सनियंत्रण (दीक्षा समिती) समितीचे अध्यक्ष तथा खासदार हेमंत गोडसे यांनी केले. सायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली.
बैठकीस राकेश वाणी, राजेंद्र निकम, के. आर. शिरसाठ, संजय सूर्यवंशी, गोकुळ वाघ, डी. जे. देवरे, के.पी. खैरनार, रवींद्र वाघ, संदीप वळवी, अरविंद पगारे, शीतलकुमार तुवर, बी.जी. पाटील, ए. एच. पगारे, विलास सोनवणे, के. के. नवले, बाळासाहेब व्यवहारे, सुधाकर एस. पवार, जे. आर. पाटील, विजय पाटील, अभिजित जमधडे, प्रशांत राहणे, एस. एस. देवरे आदी तालुकास्तरावरील कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
(फोटो:आर:०४आढावा बैठक)