पहिलीच्या पुस्तक छपाईला विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:11 AM2018-06-07T00:11:18+5:302018-06-07T00:11:18+5:30
नाशिक : राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यात मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू असताना इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची छपाईच पूर्ण झाली नसल्याने पुस्तक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आठ विभागीय भांडारांमार्फत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू असताना पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा वेळेत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार की नाही, याविषयी शंका निर्माण झाली आहे.

सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाची पुस्तके शाळांमधून मोफत दिली जातात. बालभारतीच्या राज्यातील आठ पाठ्यपुस्तके भांडार आणि वितरण केंद्राच्या माध्यमातून राज्यभर पुस्तकांचा पुरवठा सुरू करण्यात आला असून ३१ मे रोजीच संपूर्ण पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असला तरी पहिलीची सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक पुस्तके छपाईची प्रक्रिया रेंगाळल्याने पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा कुठेही होऊ शकलेला नाही.
वेळेत पुरवठा करणार
पहिलीच्या पुस्तकांच्या छपाईची प्रक्रिया सुरू असली तरी सर्व शाळांना वेळेत पुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे. छपाईची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून, कोणालाही त्यामुळे विलंब होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी पहिलीची पुस्तके उपलब्ध होतील.
- सुनील मगर, संचालक,
बालभारती यंदा पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदलला आहे. मात्र विज्ञान आणि बीजगणित वगळून इतर विषयांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे पहिलीच्या दोन पुस्तकांची छपाई पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा वितरणास विलंब झाला आहे. ३१ मेपर्यंत पुरवठा करण्यात येणार होता आणि ७ तारखेपर्यंत शाळांना वितरण केले जाणार होते. मात्र पहिलीच्या पुस्तकांना विलंब झाल्याने सर्वच पुस्तके घेऊन जाण्यासाठी शाळांना दोनदा तालुक्यातील केंद्रावर चकरा माराव्या लागणार आहेत.