आडगाव परिसरातील अतिक्रमण हटवा

By admin | Published: December 9, 2015 11:32 PM2015-12-09T23:32:22+5:302015-12-09T23:33:16+5:30

निवेदन : नागरिकांनी घेतली उपमहापौरांची भेट

Delete encroachment at Adgaon area | आडगाव परिसरातील अतिक्रमण हटवा

आडगाव परिसरातील अतिक्रमण हटवा

Next

नाशिक : आडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक १ मधील अतिक्रमण हटविण्याची मागणी करणारे निवेदन नगरसेवक मीना माळोदे यांच्यासह नागरिकांनी उपमहापौर गुरुमित बग्गा यांना दिले. सदर अतिक्रमण त्वरित न हटविल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा माळोदे यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १ मधील आडगाव येथील गट नंबर ७७२ येथे शासकीय भूखंड असून, तो विनावापर पडून आहे. सदर जागेत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या, हॉटेल, गॅरेज, दुकाने यांचे अतिक्रमण झाले आहे. शिवाय जागेवर अनधिकृतपणे शेणखताचे ट्रकही उभे केले जात असल्याने दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच जागेवर लोकांकडून अनधिकृतपणे पार्किंगचेही पैसे उकळले जातात.
गट नंबर १५१४ या जागेतही गोसावी समाजाची तीन गुंठे जागा असून, त्यापैकी दोन गुंठे जागा रस्त्यासाठी संपादित करण्यात आली आहे. परंतु संपूर्ण जागेवर अनधिकृतपणे तार कंपाउंड करण्यात आले आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर व दशक्रिया विधी शेडलगत मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी झाल्याने अंत्यविधीला जाणाऱ्या जनतेला अडथळा निर्माण होतो.
आडगावातून सय्यद पिंप्री, माडसांगवी, खेरवाडी, विंचूर गवळी या गावांना जाण्यासाठी एकच रस्ता आहे. या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा उत्पन्न होत असतो. सदर अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी बालाजी माळोदे, एकनाथ पाटील मते, निवृत्ती मते, बाळासाहेब झोमान, बालाजी धोंडगे, पोपट लभडे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Delete encroachment at Adgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.