आजीबाईंचा बटवा अन् कोरोनाला हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:17+5:302021-05-26T04:14:17+5:30
सर्दी, खोकला, दमा, ताप आलेल्या व्यक्ती प्राणायम, दीर्घ श्वसन, कपालभाती प्राणायम करीत आहेत. आजीने सांगितल्यानुसार दिवसातून एकदा आल्याचा ...
सर्दी, खोकला, दमा, ताप आलेल्या व्यक्ती प्राणायम, दीर्घ श्वसन, कपालभाती प्राणायम करीत आहेत.
आजीने सांगितल्यानुसार दिवसातून एकदा आल्याचा किस त्यावर लिंबू रस आणि सैंधव मीठ टाकून जेवताना चावून खाण्यास दिले जात आहे. पिण्याच्या पाण्यात सोन्याची गिनीं टाकून उकळून सोसवेल इतके कोमट पाणी दिले जातेय.
नाकात खोबरेल तेलाचे दोन थेंब टाकले जात आहेत. सर्दी झाल्यास अद्रक साजूक तुपात तळून त्याचे तुकडे दिवसभर चघळावेत, अद्रक, दालचिनी, काळीमिरी, लवंग तोंडात ठेवावे, चावून खाऊ नये. त्याच्या रसाचे सेवन करावे. तुळशीचे पान आणि खडीसाखर चावून खावी. सुका मेवा, गाईचे तूप यांचा वापर करावा.
कशाचा काय उपयोग
१) खोकला आल्यास आल्याचा रस काढून त्यात मध टाकून चाटण घ्यावे त्यामुळे आराम मिळतो. तीन दिवस हा प्रयोग करावा. २) सर्दी घालवण्यासाठी साजूक तुपात अद्रक तळून घ्यावे. नंतर त्याचे तुकडे तोंडात ठेवावेत, काही वेळानंतर चावून खाऊन घ्यावे.
३) ओवा तव्यावर भाजून कापडात बांधावा. त्याने गळा, नाक आणि छाती शेकवावी. याचा लहान मुलांना फायदा होतो. कफ लवकर बाहेर पडून छाती मोकळी होते.
डॉक्टरांची प्रतिक्रिया...
आजीबाईच्या बटव्यातील औषधींपैकी बऱ्याच गोष्टी आपल्या आहारात, फोडणीत रोज असतात. गरज आहे ती अन्न ताजे आणि वेळेवर आणि कुठल्याही व्यत्ययाशिवाय खाण्याची. शिळे, थंड झालेले पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यातील पौष्टिक आवश्यक घटक कमी होतात, मग फायदा कसा दिसेल? गरज, आवड आणि सोय यातील फरक समजून आहार घ्यावा. स्वच्छतेचा आग्रह, व्यायामात नियमितता आणि काळजी हे महत्त्वाचे. त्रास काय आणि किती होतोय हे बघून औषधे वापरावीत. अतिरेक नक्कीच नको. नाकात तीळ तेल / खोबरेल तेल / वैद्यांनी सुचविलेले औषधी तेल २-२ थेंब रोज २ वेळा टाकणे फायदेशीर राहील. आजारी असो वा नसो प्रत्येकाने खूश, आनंदी अन् उत्साही कसे राहता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे. या पॉझिटिव्ह गोष्टीच आपल्याला निगेटिव्ह राहायला मदत करणाऱ्या असणार आहेत.
- डॉ. अपश्चिम सुगन बरंठ
आजींच्या प्रतिक्रिया...
सर्दी असल्यास रात्री हळद टाकून दूध गरम करून पिल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते. घरगुती औषधी काढा घ्यावा.
- निर्मला पवार
आमच्या लहानपणी आमची आजी घरगुती आयुर्वेदिक औषधे देत असे. त्यामुळे आम्हाला फारसे डॉक्टरकडे जावे लागत नसे. कफ झाल्यास गरम केलेले पाणी कोमट झाल्यावर प्यायला दिले जायचे. त्यामुळे उलट्या होऊन शरीरातील कफ निघून जायचा.
- चंद्रभागा सोनवणे
दोन ते तीन लीटर पाणी घेऊन त्यात लिंबूचे साल, आल्याचे तुकडे, दालचिनी टाकून पाणी उकळून घ्यावे, घरातील सर्व सदस्यांनी प्यावे. सकाळ-संध्याकाळ वाफ घ्यावी.
- लयलाबाई शेख
===Photopath===
250521\25nsk_34_25052021_13.jpg~250521\25nsk_35_25052021_13.jpg
===Caption===
निर्मला पवार~चंद्रभागा सोनवणे