रस्त्यावरील धोकेदायक वृक्ष हटवावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:29 AM2018-05-20T00:29:03+5:302018-05-20T00:29:03+5:30
अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाप्रमाणेच रस्त्यावरील धोकेदायक वृक्षसुद्धा हटवावेत, अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठवले आहे.
नाशिक : अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाप्रमाणेच रस्त्यावरील धोकेदायक वृक्षसुद्धा हटवावेत, अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठवले आहे. या पत्रात राष्टÑवादीने म्हटले आहे की, महापालिका हद्दीत आयुक्तांनी अनेक निर्णय घेतले; परंतु या सर्व निर्णयांमध्ये रस्त्यावरील धोकेदायक वृक्षांचा प्रश्न जसाच्या तसा राहिला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवणार आहेत. रस्त्यावरील धोकेदायक वृक्ष काढून त्यांचे पुनर्रोपण करावे. मुख्य रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची तोड करून त्याचे पुनर्रोपण करावे असा आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेला आहे. या आदेशान्वये शहरात यापूर्वी पुनर्रोपण प्रक्रिया राबविली गेली; परंतु जे वृक्ष मुख्य रस्त्याच्या कडेला आहेत तेच तोडून पुनर्रोपण करण्यात आले. यानंतर ही मोहीम थंडावली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सतत पाठपुरावा केल्यानंतर गंगापूररोडवरील धोकेदायक वृक्ष हटविण्यात आले; परंतु सद्यस्थितीत गंगापूररोड वगळता शहरातील एकाही ठिकाणचे धोकेदायक वृक्ष हटविले गेले नाही. रात्रीच्या वेळी अंधारात मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेले वृक्ष दिसून येत नसल्याने अपघाताची संख्या वाढत आहे. दिंडोरीरोड, द्वारका अशा विविध ठिकाणी अनेक धोकेदायक वृक्ष आहेत याकडे सुद्धा महापालिकेने लक्ष दिले पाहिजे व त्यांचे पुनर्रोपण केले पाहिजे असे या पत्रात नमूद केले आहे.