स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवत स्वखर्चाने कॉँक्रिटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:55 AM2018-04-26T00:55:35+5:302018-04-26T00:55:35+5:30
महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जात असतानाच कानडे मारुती लेन येथील रहिवासी व व्यापारी यांनी सामासिक अंतरात केलेले वाढीव बांधकाम स्वत:हून काढून घेत स्वखर्चातून रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले.
नाशिक : महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जात असतानाच कानडे मारुती लेन येथील रहिवासी व व्यापारी यांनी सामासिक अंतरात केलेले वाढीव बांधकाम स्वत:हून काढून घेत स्वखर्चातून रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले. जुने नाशिक म्हणजेच गावठाण परिसरात पार्किंग, वाहतूक कोंडी व त्यातून होणारे वाद या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत. कानडे मारु ती लेन ही अरुंद आहे. याठिकाणी रहिवासी व व्यापाऱ्यांनी इमारतीचे बांधकाम करताना वाढीव जागेत ओट्यांचेही बांधकाम केले होते. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या गल्लीत वाहन कोंडी होण्याबरोबरच वाहनतळाचीही अडचण होत होती. महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई होण्यापूर्वी परिसरातील रहिवासी व व्यापारी यांनी एकत्र येत कानडे मारुती लेनमधील सात इमारतींचे १२ फूट नव्हे तर जवळपास ३ बाय ६० मीटर इतक्या जागेवरील वाढीव बांधकाम स्वेच्छेने काढून घेतले. शिवाय, स्वखर्चाने रस्त्याचे रु ंदीकरण व कॉँक्रि टीकरण करून परिसरातील वाहनतळ व वाहन कोंडीचा प्रश्न पूर्णत: निकाली काढला. वाढीव स्वरूपात बांधकाम केल्याची बाब मिळकतधारकांच्या लक्षात आल्यावर परिसरातील सर्व नागरिक व व्यापारी यांनी एकत्र येत सामंजस्याने आपापल्या इमारतींसमोरील वाढीव बांधकाम काढून घेतले. सदर बांधकाम स्वत:हून काढून घेण्यासाठी अॅड. अक्षय कलंत्री, विनोद पोफळे, विवेक कुलकर्णी, अतुल मानकर, विलास देवकर, अतुल लोहिते, सतीश धात्रक, चिमन साधवानी, अनिश लालवानी यांनी पुढाकार घेतला.
रोहित्र हलविण्याची मागणी
कॉँक्रि टीकरण व रस्ता रु ंदीकरणामुळे नाशिक मनपाचा एक पथदीप व महाराष्ट्र विद्युत मंडळाचे एक रोहित्र रस्त्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी नाशिक मनपा व विद्युत मंडळ यांच्याकडे रीतसर निवेदन दिलेले असून, विद्युत रोहित्र तत्काळ इतरत्र हलविण्याची मागणी कार्यकारी अभियंता सवाईराम यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबत आमदार देवयानी फरांदे यांचीदेखील भेट घेऊन सदर समस्या मांडली असता त्यांनीही व्यक्तिश: लक्ष घालून सदर रोहित्र इतरत्र हलविण्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.