थिएटर आॅलिम्पिकसाठी ‘संगीत देवबाभळी’ची निवड दिल्लीत महोत्सव : भारताला प्रथमच यजमानपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:44 AM2017-12-03T00:44:12+5:302017-12-03T00:45:26+5:30
नाशिक : नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाºया थिएटर आॅलिम्पिकसाठी लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांची निर्मिती असलेल्या ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकाची निवड झाल्याची माहिती शुक्रवारी (दि. १) कुसुमाग्रज स्मारक येथील स्वगत सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
नाट्यकलावंतांसाठी अत्यंत महत्त्वाचा महोत्सव म्हणून थिएटर आॅलिम्पिकची ओळख आहे. दिल्ली येथील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सव ग्रीस, जपान, मॉस्को, रशिया, तुर्की, चीन, पोलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आल्यानंतर आता भारताकडे या महोत्सवाचे पहिल्यांदाच यजमान पद आले आहे. जगभरात या थिएटर आॅलिम्पिकचे विशेष आकर्षण असल्याने तसेच भारताला या महोत्सवाचे यजमानपद मिळालेले असल्याने दरवर्षी भरविण्यात येणारा मानाचा भारत रंग महोत्सव वेगळा न भरवता या महोत्सवाचा समावेश थिएटर आॅलिम्पकमध्ये करण्यात येणार आहे. आगामी २०१८ स्पर्धेत या थिएटर आॅलिम्पिक स्पर्धेची ‘फ्लॅग आॅफ फ्रेंडशीप’ ही संकल्पना असून, एकूण ५० दिवसांच्या महोत्सवात देशभरातून ११००, तर विदेशातून ४५० नाटकांची निवड करण्यात आली आहे. अश्वमेध आणि स्पंदन यांची निर्मिती असलेल्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचे संगीत दिग्दर्शन आनंद ओक यांचे असून, नेपथ्य प्रणव प्रभाकर, प्रकाश योजना प्रफुल्ल दीक्षित, राजेश भुसारे, तर वेशभूषा आणि रंगभूषा पूर्वा सावजी यांची आहे. या नाटकात गायिका रसिका नातू आणि शुभांगी सदावर्ते यांची प्रमुख भूमिका असून, वाद्यवृंदात पुष्कराज भगवत, सौरभ कुलकर्णी, अभिषेक दांडेकर, रोहन कानडे यांचा समावेश आहे. या संगीत नाटकाचे निर्मिती प्रमुख श्रीपाद देशपांडे, तर सूत्रधार दत्ता पाटील, सचिन शिंदे आणि सदानंद जोशी हे आहेत. थिएटर आॅलिम्पिकसाठी निवड झालेले नाशिकची कलाकृती असलेले ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक नाशिकच्या कलावंतांचं दिल्लीत प्रतिनिधित्व करणार असून, ही अभिमानाची गोष्ट असल्याची माहिती प्राजक्त देशमुख, आनंद ओक यांनी दिली.