सजावट साहित्याची रेलचेल
By admin | Published: December 21, 2016 10:49 PM2016-12-21T22:49:38+5:302016-12-21T22:49:58+5:30
तयारी नाताळची : बाजारपेठेत आकर्षक वस्तूंची दुकाने सजली
नाशिक : चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सोनेरीचंदेरी रंगातली सजावट साहित्याची बाजारात रेलचेल पहायला मिळत आहे. शहरातील मेनरोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, कॉलेजरोड आदिंसह उपनगरात या साहित्याची दुकाने ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. गडद हिरव्या रंगातील संपूर्ण सजावट असलेल्या ख्रिसमस ट्री एक फूट ते दहा फूट या उंची व प्रकारात ५० रुपयांपासून ४५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. नाताळ म्हटले की घराबाहेर चमचमत्या चांदण्यांचे आकाशकंदील व लायटिंग माळांनी सजावट केली जाते. घराबरोबरच दुकाने, आॅफिस, रेस्टॉरंट, चर्च आवारातही अशी सजावट आढळते. यासाठी लागणारे आकाशकंदील २०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत विविध आकार व प्रकारात बाजारात दाखल झाले आहेत. याशिवाय सांताक्लॉज स्टॅच्यू, स्नोडिंग बेल, स्टार, स्टिक्स, ड्रम, अॅपल, बॉल्स, चॉकलेट्स, मोजे आदि छोट्या सजावटीच्या वस्तूही लक्षवेधून घेत आहेत. ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या वस्तूंनी ‘ख्रिसमस ट्री’ची सजावट केली जाते. लाल रंगाच्या कॅपही २५ रुपये दराने मिळत आहेत. फेस मास्क २०० ते २५० रुपयांपर्यंत मिळत असून, संपूर्ण नाताळाचा देखावा असलेले ग्लिटरिंग पोस्टर २५० ते ४०० रुपयांपर्यंत आहे. नाताळाच्या महत्त्वाच्या सणाला एकमेकांना शुभेच्छाकार्ड देऊन शुभेच्छा देण्यालाही महत्त्व असते. त्यादृष्टीने १५ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विविध आकार, प्रकाराचे शुभेच्छा कार्डही बाजारात दाखल झाले आहेत. नाताळात सांताक्लॉजला असलेले विशेष महत्त्व लक्षात घेता लालचुटूक रंगातील सांताक्लॉजचा संपूर्ण पोषाखही बाजारात भाव खावून जात आहे. (प्रतिनिधी)